लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी निघालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 18:49 IST2021-05-28T18:49:09+5:302021-05-28T18:49:19+5:30
अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी निघालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू
पिंपरी: मावशीच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी निघालेल्या दुचाकीस्वाराचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला आहे. बुधवारी संत निरंकारी सत्संग भवन, निगडी याठिकाणी हा अपघात घडला आहे.
आनंद प्रमोद सिरसाठ (वय २१ ) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी मृत तरुणाचा भाऊ प्रतिक प्रमोद सिरसाठ (वय २३, रा. सोमाटणे फाटा, मावळ) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात ट्रक चालकालविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद व त्याचा भाऊ प्रतिक दोघेजण दुचाकीवरून मावशीच्या लग्नाच्या वाढदिवसाचा केक आणण्यासाठी निघाले होते. संत निरंकारी सत्संग भवन, निगडी येथील सार्वजनिक रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दोघेही दुचाकीवरून खाली पडले. खाली पडलेल्या आनंद प्रमोद सिरसाठ याच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले व त्याचा मृत्यू झाला. ट्रकचालक ट्रकसह पळून गेला.