प्रोटीन सप्लीमेंटच्या दुकानात वाद वाढला; जीम ट्रेनर तरुणीकडून भरदिवसा तरुणाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:55 IST2025-08-14T12:55:21+5:302025-08-14T12:55:41+5:30
- सहकाऱ्याच्या मदतीने डोक्यात गजाने मारहाण; दोघांना अटक

प्रोटीन सप्लीमेंटच्या दुकानात वाद वाढला; जीम ट्रेनर तरुणीकडून भरदिवसा तरुणाचा खून
पिंपरी/भोसरी : प्रोटीन सप्लीमेंटच्या दुकानात झालेल्या वादानंतर जीम ट्रेनर तरुणीने सहकाऱ्याच्या मदतीने लोखंडी गजाने मारहाण करून वडमुखवाडीतील तरुणाचा खून केला. आळंदी नगर परिषद हद्दीतील काळे काॅलनीत ‘प्रोटीन पझल’ नावाच्या दुकानात बुधवारी (दि. १३ ऑगस्ट) दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर मारहाण करणाऱ्या दोघांनीही पळून न जाता थेट दिघी पोलिसांत जाऊन खुनाची कबुली दिली. गोपीनाथ ऊर्फ लल्ला वरपे (वय ३५, रा. वडमुखवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रांजल दिलीप तावरे (२२, रा. पठारे मळा, चऱ्होली) आणि यश पाटोळे (२६, रा. डुडुळगाव, आळंदी) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रांजल तावरे आणि यश पाटोळे हे दोघे चोविसावाडी फाट्यावर असलेल्या एका जीममध्ये ट्रेनर आहेत. शिवाय आळंदी येथील काळे काॅलनीत देहू फाटा येथे त्यांचे ‘प्रोटीन पझल’ नावाचे सप्लीमेंट विक्रीचे दुकान आहे.
मृत गोपीनाथ वरपे याच्याशी जीममध्ये प्रांजलची ओळख झाली होती. मात्र, काही कारणातून त्यांच्यात वाद झाला होता. बुधवारी दुपारी अडीच ते पावणेतीनच्या सुमारास प्रांजलने गोपीनाथला चऱ्होली फाट्यावर बोलण्याच्या निमित्ताने बोलावून घेतले. तेथून दुचाकीवर बसून ते आळंदी हद्दीतील धाकट्या पादुका मंदिरासमोर गेले. तेथे जाताच प्रांजल आणि नंतर आलेल्या यशने गोपीनाथला लोखंडी गजाने डोक्यात जबर मारहाण केली. त्याला तेथेच सोडले व दुकानाचे शटर बंद करून निघून गेले. गंभीर जखमी झालेल्या गोपीनाथला काहींनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, गोपीनाथला मारहाण केल्यानंतर यश पाटोळे आणि प्रांजल तावरे हे दोघेही पोलिस ठाण्यात गेले. तेथे त्यांनी खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर दिघी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी रात्री उशिरा दिघी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला.
मृत गोपीनाथ अविवाहित
मृत गोपीनाथ ऊर्फ लल्ला वरपे वडमुखवाडी (चऱ्होली) येथील असून, तो अविवाहित होता. तो कोठेही कामाला जात नसला तरी, वडिलोपार्जित संपत्तीमुळे श्रीमंत व्यक्ती म्हणून परिचित होता. अनेकांना त्याने आर्थिक मदतही केली होती.