उपचारासाठी रुग्णालयात निघालेल्या महिलेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू; पुणे-आळंदी रस्त्यावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 14:42 IST2021-06-12T14:42:44+5:302021-06-12T14:42:57+5:30
पुणे-आळंदी रस्त्यावरील तापकीर चौक, चोविसावाडी (ता. हवेली) येथे हा अपघात झाला.

उपचारासाठी रुग्णालयात निघालेल्या महिलेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू; पुणे-आळंदी रस्त्यावरील घटना
पिंपरी : उपचारासाठी रुग्णालयात जात असलेल्या दुचाकीस्वार महिलेला ट्रकच्या धडकेने मृत्यू झाला. पुणे-आळंदी रस्त्यावरील तापकीर चौक, चोविसावाडी (ता. हवेली) येथे शुक्रवारी (दि. ११) सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला.
शिल्पा राजेंद्र वाल्हेकर (वय ४९, रा. संगमनेर, अहमदनगर), असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. अजय ओमप्रकाश ससाणे (वय ४१, रा. दत्तवाडी, नेरे, ता. मुळशी, मूळ रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनोजकुमार सीताराम भोसले (वय २८, रा. मळनगाव, ता. कवठेमहांकाल, जि. सांगली), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी ट्रकचालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा वाल्हेकर यांच्यावर उपचार करण्यासाठी आळंदी येथे त्यांचे भाऊ फिर्यादी अजय ससाणे यांच्यासोबत जात होत्या. फिर्यादी अजय ससाणे हे दुचाकी चालवित होते. त्यावेळी आरोपी चालवित असलेल्या भरधाव ट्रकची फिर्यादी चालवित असलेल्या दुचाकीला धडक बसली. यात फिर्यादी व त्यांची बहीण शिल्पा वाल्हेकर हे दोघेही दुचाकीवरून खाली पडले. यात फिर्यादी हे जखमी झाले. तर शिल्पा वाल्हेकर या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक एस. बी. दरेकर तपास करीत आहे.