जीम इन्स्ट्रक्टरची नोकरी दिली नाही म्हणून महिलेची जीम मालकाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 15:35 IST2022-08-06T15:30:10+5:302022-08-06T15:35:01+5:30

पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे....

Woman beats up gym owner for not giving him job as gym instructor | जीम इन्स्ट्रक्टरची नोकरी दिली नाही म्हणून महिलेची जीम मालकाला मारहाण

जीम इन्स्ट्रक्टरची नोकरी दिली नाही म्हणून महिलेची जीम मालकाला मारहाण

पिंपरी : जीममध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून मुलाखत देऊनही नोकरी दिली नाही म्हणून महिलेने जीम मालकाला मारहाण केली. ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजता बिच बॉडीज जीम, आकुर्डे प्राधिकरण येथे घडली. या प्रकरणी निगडी पोलिसांमध्ये महिलेने फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीम मालकाने इंस्टाग्रामवर लेडी इन्स्ट्रक्टर हवी म्हणून जाहिरात दिली होती. त्यानुसार आरोपी महिलेने मुलाखत दिली होती. मुलाखत झाल्यानंतर जीमचे मालक मयुरेश केशव मोरे यांनी महिलेला जर तुमची निवड झाली तर तुम्हाला कळविण्यात येईल, असे सांगितले.

मुलाखत झाल्यानंतर देखील दोन तीन दिवसांत नोकरीचा कॉल न आल्याने आरोपी महिलेने गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास थेट बिच बॉडीज जीममध्ये प्रवेश केला. यावेळी मयुरेश आणि फिर्यादी महिला जीममधील साहित्य उचलून ठेवत होते. त्यावेळी आरोपी महिलेने आय विल कील यू, असे म्हणत फिर्यादी महिलेच्या डोक्यात जीममधील डम्बेल मारण्याचा प्रयत्न केला.

फिर्यादी महिलेला वाचविण्यासाठी मयुरेश मोरे यांनी आरोपी महिलेला पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने हाताला डम्बेलने मयुरेश यांना मारला. तसेच आपल्या हातात असलेल्या काचेच्या टोकदार तुकड्याची भीती दाखवत दहशत निर्माण केली, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Woman beats up gym owner for not giving him job as gym instructor