चोरट्याचा कहर! थेट पोलिसाच्या घरात घुसून ओळखपत्रासहित रोकड केली लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 16:14 IST2021-05-19T16:14:32+5:302021-05-19T16:14:41+5:30
पिंपरीत मोशी प्राधिकरण येथे घडली घटना

चोरट्याचा कहर! थेट पोलिसाच्या घरात घुसून ओळखपत्रासहित रोकड केली लंपास
पिंपरी: अज्ञात चोरट्याने सहायक फौजदाराचे पोलीस ओळखपत्र, मोबाइल, पॅनकार्ड व पाच हजारांची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोशी प्राधिकरण येथे मंगळवारी सकाळी पावणेसात ते सातच्या दरम्यान हा प्रकार घडला.
संजीव नाथा गाढवे (वय ५८, रा. मोशी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी मंगळवारी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाढवे हे एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्त आहेत. ते मंगळवारी सकाळी पावणेसात ते सातच्या दरम्यान घरात नव्हते. तसेच त्यांच्या घरातील इतर सर्वजण झोपले असल्याचा गैर फायदा घेऊन चोरट्याने घरात प्रवेश केला. मोबाइल, पॅनकार्ड, पाच हजारांची रोकड तसेच पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस ओळखपत्र चोरट्याने त्यांच्या घरातून चोरून नेले.
चोरीचा हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक संजीव गाढवे यांनी तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार बी. बी. कोतवाल पुढील तपास करत आहेत.