घरगुती वादातून पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 21:09 IST2019-05-25T21:07:47+5:302019-05-25T21:09:20+5:30
मागील आठ ते दहा दिवसांपासून संगीता व राजेंद्र या पती-पत्नींमध्ये वाद सुरु होते.

घरगुती वादातून पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या
पिंपरी : घरगुती वादातून पत्नीचा खून करुन पतीने आत्महत्या केल्याची घटना चिखलीतील कृष्णानगर येथे शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. संगीता राजेंद्र भोसले (वय ४७) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर राजेंद्र प्रल्हाद भोसले (वय ५०) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक बालाजी सोनटक्के यांनी दिलेली माहिती अशी, मागील आठ ते दहा दिवसांपासून संगीता व राजेंद्र या पती-पत्नींमध्ये वाद सुरु होते. दरम्यान, शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास राजेंद्र याने संगीता यांच्यावर चाकूने वार केले. तर राजेंद्र याने घरातीलच लोखंडी अँगलला कापडाच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली.संगीता यांच्यावर वार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. जखमी अवस्थेत त्या सरकत सरकत दरवाजाजवळ आल्या. मदतीसाठी त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी घरासमोर असलेल्या लहान मुलाला संगीता ओरडत असल्याच्या दिसल्या. त्यानंतर हा प्रकार लहान मुलाने घरी जावून वडिलांना सांगितला. त्या मुलाच्या वडिलांनी घटनास्थळी धाव घेत संगीता यांना बाहेर काढले. तसेच याबाबतची माहिती संगीता यांच्या मुलाला दिली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, चाकूहल्लयात गंभीर जखमी झाल्याने संगीता यांचा मृत्यू झाला.
राजेंद्र भोसले याचे एमआयडीसी परिसरात छोटे वर्कशॉप होते. मात्र, ते बंद पडल्यानंतर कॅबचालक म्हणून काम करीत होते. भोसले दाम्पत्याला एक विवाहित मुलगा असून तो पत्नीसह दुसरीकडे राहतो तर एक मुलगा त्यांच्याजवळच राहतो. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.कार्यकर्ते आहेत.