पहिल्या तिमाहीत १५ कोटींची पाणीपट्टी वसूल;गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ४५ लाखांनी अधिक महसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 12:06 IST2025-07-20T12:05:52+5:302025-07-20T12:06:16+5:30
पाणीपुरवठा विभागांतर्गत १.८० लाखांहून अधिक नळधारक असून निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक गटांतून पाणीपट्टीची वसुली सुरू

पहिल्या तिमाहीत १५ कोटींची पाणीपट्टी वसूल;गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ४५ लाखांनी अधिक महसूल
पिंपरी : महापालिकेने महसूल संकलनासाठी राबविलेल्या धोरणात्मक पावलांना यश मिळू लागले आहे. मालमत्ता करासोबतच पाणीपट्टी वसूल करण्याचा निर्णय प्रशासनासाठी फायदेशीर ठरला असून, वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महापालिकेने १५ कोटी ५३ लाख ११ हजार ७३० रुपयांची पाणीपट्टी जमा केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये ४५ लाखांची वाढ झाली आहे.
पाणीपुरवठा विभागांतर्गत १.८० लाखांहून अधिक नळधारक असून निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक गटांतून पाणीपट्टीची वसुली सुरू आहे. करसंकलन विभागाने राबविलेल्या मोहिमेमुळे ही वसुली प्रभावी ठरली आहे. मागील वर्षी १५ कोटी ८ लाख १९ हजार ६५१ रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात आली होती.
अद्यापही ३२ हजार नळधारक थकबाकीदार
महापालिकेच्या नोंदीनुसार ३२,४६० नळधारक अद्याप पाणीपट्टी थकवून आहेत. या थकबाकीदारांवर कठोर कारवाईची शक्यता असून, प्रशासनाने नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
बंद व नादुरुस्त मीटरधारकांना नोटीस
अनेक ठिकाणी पाणीपट्टीचे मीटर नादुरुस्त असून, त्यामुळे बिल आकारणीत अडचणी येत आहेत. लवकरच मीटर दुरुस्तीबाबत नोटीस बजावली जाईल. नागरिकांनी पुढाकार घेऊन मीटर तत्काळ दुरुस्त करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अशी झाली पाणीपट्टी वसूल
- धनादेशाद्वारे : ५ कोटी ९० लाख ९८ हजार ५८५
- रोख स्वरूपात : ३ कोटी ९ लाख ७ हजार ९८६
- ऑनलाइन भरणा : ६ कोटी ५३ लाख ५ हजार १५९
- एकूण : १५ कोटी ५३ लाख ११ हजार ७३०
मालमत्ता करासोबत पाणीपट्टी वसूल करण्याचा निर्णय महसूलवाढीच्या दृष्टिकोनातून योग्य ठरला आहे. वेळेत कर भरून सहकार्य करावे, अन्यथा थकबाकीदारांवर कारवाई करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. - प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त