पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये पेट्रोल सोबत पाणी मिसळल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शाहुनगरमधील भोसले पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर काही वेळातच अनेक वाहने बिघडल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे पेट्रोल पंपाकडून होणारी फसवणूकीबाबत अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.
हिंदुस्थान पेट्रोलियमद्वारे चालवल्या जाणाऱ्या भोसले पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या वाहन चालकांनी इंजिनमध्ये बिघाड झाल्यावर लगेच तक्रार केली. फक्त एक किंवा दोन लिटर पेट्रोल भरल्यावर इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला. तपासणीनंतर पाणी आढळून आले, ज्यावर थोडेसे पेट्रोल तरंगत होते. अहवालात असे दिसून आले आहे की पाण्याचे प्रमाण ८०% पाणी ते २०% पेट्रोल होते. पेट्रोल पंपाच्या जमिनीखाली असणाऱ्या पेट्रोल टाक्यांमध्ये पाणी शिरल्याने ही समस्या उद्भवली असावी असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु असे खरंच झाले आहे का? की जाणूनबुजून पेट्रोलमध्ये पाणी मिसळण्यात आले आहे. याबाबत तपास सुरु आहे.
ग्राहकांच्या मागण्या आणि चौकशी सुरू
या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी तात्काळ चौकशी आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपाच्या पेट्रोल साठवण व्यवस्थेची तपासणी करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक कायदेशीर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.