सावधान ..! पिंपरी-चिंचवड शहरातील १३ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: February 3, 2025 16:56 IST2025-02-03T16:55:33+5:302025-02-03T16:56:33+5:30

दूषित पाण्याद्वारे 'जीबीएस'ची लागण हाेण्याची शक्यता असल्याने महापालिकेने या भागातील पाण्याची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेतला

Water in 13 places in Pimpri-Chinchwad city is unfit for drinking | सावधान ..! पिंपरी-चिंचवड शहरातील १३ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य

सावधान ..! पिंपरी-चिंचवड शहरातील १३ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य

पिंपरी : गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे रूग्ण वाढत असल्याने महापालिकेने शहरातील २३ ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राज्य आराेग्य प्रयाेगशाळेत पाठविले हाेते. त्यापैकी थेरगाव, पिंपरी, काळेवाडी, अजमेरा, दिघी, ताथवडे, माेशी, भूमकर वस्ती आदी १३ परिसरातील पाणी पिण्यास अयाेग्य असल्याचा अहवाल आला आहे. दूषित पाण्याद्वारे 'जीबीएस'ची लागण हाेण्याची शक्यता असल्याने महापालिकेने या भागातील पाण्याची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात जीबीएस आजाराचे १७ संशयित रूग्ण आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील पाणी तपासणीची माेहिम हाती घेतली आहे. या आजाराची प्राथमिक लक्षणे आढळलेली संशयित रूग्ण ज्या भागात वास्तव्य करतात, त्या परिसरात महापालिकेद्वारे नळामार्फत पुरविल्या जाणाऱ्या पाण्याचे नमुने तपासण्यात येत आहेत. त्यानुसार शहरातील २३ ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राज्य आराेग्य प्रयाेगशाळेत पाठविले हाेते. त्यापैकी थेरगाव, पिंपरी, काळेवाडी, अजमेरा, दिघी, ताथवडे, माेशी, भूमकर वस्ती, संत तुकारामनगर परिसरातील पाणी पिण्यास अयाेग्य असल्याचा अहवाल आला आहे.

निर्जंतुकीकरण करूनच पाणीपुरवठा
महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी निर्जंतुकीकरण केले जाते. विविध शास्त्रोक्त प्रक्रियांचे अवलंब करुनच शहरामध्ये पाणीपुरवठा केला जातो. पाणी निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक असणारी 'टीसीएल' पावडर वापरण्यात येते. नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राकडून अत्यावश्यक प्रक्रियांचा अवलंब करण्यात येत आहे. अत्याधुनिक पद्धतीने पाच टप्प्यात पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. क्लाेरीन टाकून पाण्यातील जंतू मारले जातात. त्यानंतर पाण्यात 'लिक्विड' मिसळले जाते. फिल्टरने पाणी स्वच्छ केले जाते. त्यानंतर शुद्ध टाकीमध्ये पाणी सोडले जाते. या टाकीत पाणी साेडतानाच निर्जंतुकीकरण करण्यासाठी आवश्यकतेनुसार 'लिक्विड क्लाेरिन' साेडला जाताे. त्यानंतर प्रयाेगशाळेत दर दहा मिनिटाला पाण्यात क्लाेरिन आहे की नाही, याची तपासणी केली जाते. त्यानंतर हे जलवाहिनीव्दारे नागरिकांना वितरित केले जाते.

ज्या भागातील पाणी दूषित आढळले आहे. त्या भागातील पाण्याची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 'ओटी साेल्यूशन' टाकून पाणी तपासण्यात येणार आहे. वैद्यकीय विभागाने पाण्याचे नमुने घेताना पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना साेबत घ्यावे.
- प्रमोद ओंबासे, मुख्य अभियंता, महापालिका

Web Title: Water in 13 places in Pimpri-Chinchwad city is unfit for drinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.