रसायनांचेच पाणी..! प्रदूषणाचे घटक पिण्याच्या पाण्यात?

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: February 8, 2025 16:05 IST2025-02-08T16:05:32+5:302025-02-08T16:05:55+5:30

पवनेचे प्रदूषित पाणी शुद्ध करण्यासाठी दररोज २ हजार ५०० टन क्लोरिन गॅस

Water full of chemicals! Pollution elements in drinking water? | रसायनांचेच पाणी..! प्रदूषणाचे घटक पिण्याच्या पाण्यात?

रसायनांचेच पाणी..! प्रदूषणाचे घटक पिण्याच्या पाण्यात?

- ज्ञानेश्वर भंडारे

पिंपरी :
शहरात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराचे २२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. दूषित पाण्याद्वारे आजाराचा सर्वाधिक प्रसार होत असल्याने शहरातील खासगी विहिरी, बोअर, टँकर आणि जारमधील पाण्याची तपासणी करण्यात येत आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील ३० लाख नागरिकांना पवना नदीतून उचललेले प्रदूषित पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी महापालिकेला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत.

महापालिकेने पवना नदीतील पाणी प्रदूषित करणाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. शिवाय शहरातील नागरिकांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाण्यासाठी बंदिस्त पवना जलवाहिनीचा प्रश्नदेखील १४ वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करताना महापालिकेकडून प्रदूषित पाण्यावर रसायनांचा मारा करूनच द्यावे लागत आहे. पण, महापालिकेने पाणी प्रदूषित करणाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.

जलशुद्धीकरण करण्यासाठी रसायनांचा उतारा

शहरातील सुमारे ३० लाख नागरिकांना पिण्यायोग्य पाणी देण्यासाठी निगडीच्या सेक्टर २३ मध्ये सन २०२० -२०२१ मध्ये वर्षभरासाठी १५० टन ब्लिचिंग पावडर लागली. तीदेखील शिल्लक राहिली. आता २०२३ - २०२४ मध्ये वर्षभरासाठी ३५० ते ४०० टन ब्लिचिंग पावडर लागली. पावसाळ्यात दररोज २ किलो तुरटी लागत होती. ती आता दररोज ८ किलो लागत आहे. पूर्वीचे टीडीएसचे प्रमाण ६० ते ७० पीपीएम होते. ते आता १०० ते ११० पीपीएमपर्यंत गेले आहे.

बंदिस्त जलवाहिनी आवश्यक

महापालिकेने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प २००८ मध्ये हाती घेतला. मात्र, २०११ मध्ये मावळातील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे तो रखडला. आता राज्य सरकारने प्रकल्पावरील स्थगिती उठविली आहे. त्यामुळे बंदिस्त जलवाहिनीचा मार्ग मोकळा झाला आहे. थेट पवना धरणातून निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रात ४८० एमएलडी पाणी बंदिस्त जलवाहिनीतून आणण्यात येणार आहे. धरण ते निगडी सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत अशा एकूण ३४.७१ किलोमीटर अंतराची समांतर जलवाहिनी टाकण्यात येणार होती. त्यापैकी महापालिका हद्दीतील ४.४० किलोमीटर भूमिगत जलवाहिनीचे काम पूर्ण झाले होते. पवनेच्या प्रदूषणामुळे बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प तातडीने होणे आवश्यक आहे.

पवना नदी उगम स्थानापासून रावेत उपसा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नदीचे प्रदूषण वाढत चालले आहे. नागरिकांना पिण्यायोग्य पाणी आम्ही देत आहोत. परंतु, पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक रसायनांचा वापर होऊ लागला आहे. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. जेणेकरून पिंपरी-चिंचवडकरांना प्रदूषणविरहित पाणी मिळण्यास मदत होईल. - प्रशांत जगताप, मुख्य रसायनी, जलशुद्धीकरण केंद्र, निगडी 

Web Title: Water full of chemicals! Pollution elements in drinking water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.