अपुरे ड्रेनेज व्यवस्थापन, नाल्यांवरील अतिक्रमण आणि बांधकामांतील दोषांमुळे भुयारी मार्गांत साचते पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:57 IST2025-06-26T15:53:52+5:302025-06-26T15:57:04+5:30

निचऱ्याचा प्रश्न कायम : रेल्वे मार्गाखालून भुयारी मार्ग काढल्याने दोन्ही बाजूने उतार; वाहतूक कोंडी, अपघात, पादचाऱ्यांना करावी लागते कसरत; नागरिकांना प्रचंड त्रास

Water accumulates in subways due to inadequate drainage management, encroachment on drains, and construction defects. | अपुरे ड्रेनेज व्यवस्थापन, नाल्यांवरील अतिक्रमण आणि बांधकामांतील दोषांमुळे भुयारी मार्गांत साचते पाणी

अपुरे ड्रेनेज व्यवस्थापन, नाल्यांवरील अतिक्रमण आणि बांधकामांतील दोषांमुळे भुयारी मार्गांत साचते पाणी

रवींद्र जगधने

पिंपरी : शहरातील रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्गांमध्ये पावसाळ्यात पाणी साचणे नित्याचे बनले आहे. अपुरे ड्रेनेज व्यवस्थापन, नाल्यांवरील अतिक्रमण आणि बांधकामांतील दोषांमुळे भुयारी मार्गांत पाणी साचत आहे. निचरा होत नसल्याने पाणी साचून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी, अपघात आणि पादचाऱ्यांची कसरत रोजच पाहावी लागत आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास ही समस्या सुटू शकते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

रावेत येथील शिंदे वस्ती, आकुर्डीतील धर्मराज चौक, बिजलीनगर येथील गुरुद्वारा चौक, पिंपरी साई चौकातील कै. किंमतराम आसवाणी भुयारी मार्ग आणि कासारवाडीतील शंकरवाडी या भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचण्याची समस्या पावसाळ्यात नित्याचीच झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे रेल्वे मार्गाखालून भुयारी मार्ग काढल्याने दोन्ही बाजूने उतार तयार झाला आहे. त्यात अपुरे ड्रेनेज व्यवस्थापन, नाल्यांचे अतिक्रमण आणि बांधकाम दोष, अनियोजित शहरीकरण, हवामान बदल आणि मुसळधार पाऊस ही प्रमुख कारणे भुयारी मार्गात पाणी साचण्याची असल्याचे सांगितले जात आहे.

हे भुयारी मार्ग धोकादायक

रावेत येथील शिंदे वस्ती, आकुर्डीतील धर्मराज चौक, बिजलीनगर येथील गुरुद्वारा चौक, पिंपरी साई चौकातील कै. किंमतराव आसवाणी भुयारी मार्ग आणि कासारवाडीतील शंकरवाडी भुयारी मार्ग.

भुयारी मार्गात पाणी साचण्याची कारणे

- भुयारी मार्गांमधील गटारी आणि नाल्यांची नियमित स्वच्छता होत नाही. पावसाळ्यापूर्वी गटारीतील कचरा, गाळ आणि प्लास्टिक काढले जात नाही, ज्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो.
- काही ठिकाणी रस्त्यांच्या बांधकामादरम्यान पाण्याच्या पाइपलाइन आणि ड्रेनेज लाइन फुटतात किंवा चुकीच्या पद्धतीने जोडल्या जातात. यामुळे पाणी भुयारी मार्गात साचते.

- शहराची वाढती लोकसंख्या आणि अनियोजित बांधकामांमुळे नैसर्गिक पाण्याचा निचरा होणाऱ्या जागा कमी झाल्या आहेत. यामुळे पावसाचे पाणी भुयारी मार्गांमध्ये जमा होते.
- हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण आणि तीव्रता वाढली आहे. कमी वेळात जास्त पाऊस पडल्याने ड्रेनेज व्यवस्था अपुरी पडते.


या आहेत उपाययोजना

- पावसाळ्यापूर्वी आणि भुयारी मार्गांमधील गटारी व नाल्यांची नियमित साफसफाई करणे गरजेचे.
- भुयारी मार्गांमध्ये उच्च क्षमतेच्या पंप आणि स्वयंचलित ड्रेनेज यंत्रणा बसवाव्यात. यामुळे पाण्याचा त्वरित निचरा होईल.

- फुटलेल्या किंवा चुकीच्या जोडलेल्या पावसाच्या पाण्याच्या आणि ड्रेनेज पाइपलाइनची तातडीने दुरुस्ती आवश्यक.
- भुयारी मार्गांचे बांधकाम करताना पाण्याचा निचरा होईल अशी रचना करावी. तसेच, रस्त्यांचा उतार योग्य ठेवावा.

- पावसाळ्यापूर्वी सर्व भुयारी मार्गांची तपासणी करून पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी तात्पुरते पंप बसवावेत.
- हवामान खात्याच्या अंदाजानुसार महापालिकेने पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करावे. त्यामुळे मुसळधार पावसाचा सामना करता येईल.


पिंपरी भुयारी मार्गात खड्डेच खड्डे

साई चौकातील कै. किंमतराव आसवाणी भुयारी मार्गात पाणी साचून राहिल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. मार्गातील बाजूच्या चऱ्या पाण्याखाली जातात. त्यामुळे अपघात होत आहेत.

आकुर्डी व गुरुद्वारा येथील भुयारी मार्गात प्रत्येक पावसाळ्यात हीच समस्या उद्भवते. पालिकेने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, जेणेकरून नागरिकांचा त्रास कमी होईल. - रामेश्वर चव्हाण, नागरिक 


साधारण ७० ते १०० वर्षांपासून रेल्वेमार्गाखालून पाणी जावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने दगडी बांधकामांत मोऱ्या तयार केल्या होत्या. त्या मोऱ्या म्हणजे आताचे भुयारी मार्ग आहेत. शंकरवाडी, दळवीनगर, आकुर्डी, प्राधिकरण, देहूरोड येथे या मोऱ्या आहेत. मात्र, रेल्वेमार्गाच्या आसपासचे रस्ते जोडण्यासाठी हे भुयारी मार्ग सोयीचे आहेत. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने सहकार्य केले आहे. या मार्गात दोन्ही बाजूंना उतार असल्याने पावसाचे पाणी साचणे साहजिक आहे. मात्र, महापालिकेने पाणी वाहून नेण्यासाठी उभारलेल्या यंत्रणेतून पावसाचे पाणी वाहून जाते. मोठ्या पावसात अर्धा-एक तास पाणी वाहून जाण्यास लागतो. - बापू गायकवाड, कार्यकारी अभियंता, वाहतूक आणि परिवहन विभाग, महापालिका

Web Title: Water accumulates in subways due to inadequate drainage management, encroachment on drains, and construction defects.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.