वारकरी संप्रदायाचा राजकारणासाठी वापर करू नये - प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 11:18 IST2024-12-18T11:16:24+5:302024-12-18T11:18:03+5:30
आळंदीत पहिली रिंगण वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

वारकरी संप्रदायाचा राजकारणासाठी वापर करू नये - प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप
पुणे : आपण सगळे वारकरी घरातून आलेलो आहोत. आपल्या मनावर या परंपरेचे पावित्र्य बिंबवलेले आहे. पण, कुणी त्याचा वापर करून समाजातील वातावरण बिघडवत असेल तर, ते आपण सहन करू नये, असे मत प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी व्यक्त केले.
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ आणि रिंगण प्रकाशन यांच्या वतीने आळंदी येथे रविवारी (दि. १५) रिंगण वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डुडुळगाव, आळंदी येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयात झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या ६८ स्पर्धकांनी भाग घेतला. संत विचारांवर आधारित पहिली आणि एकमेव असलेली ही स्पर्धा १५ ते ३० वयोगटातील तरुणांसाठी खुली होती.
जगताप पुढे म्हणाले, वारकरी संप्रदाय वापर राजकारणासाठी एखाद्या भाडोत्री ट्रोलरसारखे करण्याचा प्रकार वाढला आहे. या प्रवृत्तीला वेळीच रोखले पाहिजे. कीर्तन हे प्रबोधनाचे साधन आहे. पण, आता त्याचा राजकारणासाठी वापर होतोय का, यावर संत विचारांना मानणाऱ्यांनी लक्ष ठेवायला हवे.
यश पाटील याने ११ हजार रुपयांचे पहिले पारितोषिक तर, अभय आळशी याने ९ हजार रुपयांचे दुसरे पारितोषिक पटकावले. हे दोघेही ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील रहिवासी आहेत. हर्षदा शेरकर (बारामती), चैतन्य कांबळे (कोल्हापूर) आणि चैतन्य बावधने (पुणे) यांचा अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक आला. महेश उशीर (अहमदनगर), तेजस पाटील (कोल्हापूर), वृषभ चौधरी (सिन्नर), प्रणव जगताप (पुणे), प्रथमेश धायगुडे (रायगड) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. कोल्हापूरचे डॉ. आलोक जत्राटकर आणि आळंदीचे भागवत महाराज साळुंके यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. श्री गजानन महाराज शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विशाल तांबे, 'रिंगण'चे संपादक सचिन परब, पुणे वक्तृत्व वाद मंडळाचे डॉ. पांडुरंग कंद आणि प्रवीण शिंदे यांनीही विचार व्यक्त केले.