'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 20:07 IST2025-05-21T20:07:20+5:302025-05-21T20:07:55+5:30
वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर तिच्यावर चारित्र्याबद्दल संशय घेतला जात होता.

'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
पुणे : पिंपरी येथील २३ वर्षीय विवाहिता वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली असून, आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. वैष्णवीच्या कथित आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबीयांनी खुनाचा आरोप केला होता. आता तिची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली असून, यातून तिच्या वैवाहिक जीवनातील तणाव, छळ आणि मानसिक त्रास उघड झाला आहे.
या ऑडिओ क्लिपमध्ये वैष्णवी अत्यंत भावनिक स्वरात बोलताना ऐकू येते. ती म्हणते की, “मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं, आणि तेच माझं चुकलं.” क्लिपमध्ये वैष्णवी तिच्या नणंदेकडून सततची मानहानी, पती शशांकविषयी संशय, तसेच सासरच्यांकडून होणारा मानसिक आणि शारीरिक छळ याचा उल्लेख करते. “मला मारताना दाजी बघत होते, आणि त्यांनी पण माझ्यावर हात उचलला,” असे ती म्हणते. हे संवाद तिच्या तणावग्रस्त आणि अत्याचारांनी भरलेल्या वैवाहिक आयुष्याचे चित्र उभे करतात.
तिने या संवादात स्पष्टपणे सांगितले आहे की ती घटस्फोट घेण्याच्या तयारीत होती आणि वडिलांशी त्याबाबत बोलली होती. तिच्या म्हणण्यानुसार, वडिलांनीही त्यावर विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे तिच्या आत्महत्येच्या दाव्यावर संशय व्यक्त होत असून, तिच्या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता अधिकच बळावली आहे.
प्रेमविवाह, पण नंतर संशयाचे सावट
वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर तिच्यावर चारित्र्याबद्दल संशय घेतला जात होता. या संशयामुळे तिचा मानसिक छळ वाढत गेला. विशेष म्हणजे, वैष्णवीच्या कुटुंबीयांनी लग्नात ५१ तोळे सोनं, फॉर्च्यूनर कार, महागडी चांदीची भांडी आणि मोबाईलसह इतर अनेक वस्तू दिल्या होत्या. इतके सर्व असूनही तिला सुखी संसार न मिळता छळाचा सामना करावा लागला, असा तिच्या कुटुंबीयांचा आरोप आहे.
पोलीस तपासाला वेग
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी तपास अधिक खोलवर सुरू केला आहे. वैष्णवीच्या ऑडिओ क्लिपमधील मजकूराची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार असून, तिच्या सासरच्या मंडळींचा जबाब घेतला जात आहे. सध्या वैष्णवीचा पती, सासू-सासरे आणि नणंद यांच्यावर छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
ही क्लिप खरी असल्यास, ती वैष्णवीला आत्महत्येकडे ढकलणाऱ्या परिस्थितीचा पुरावा ठरू शकते. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ आत्महत्या म्हणून न पाहता, एका विवाहितेच्या मृत्यूपूर्व संघर्षाचा व स्वाभिमानाचा विचार करावा लागेल, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली आहे.