वैष्णवीच्या आई-वडिलांना अजित पवारांचा फोन; राजेंद्र हगवणेला सोडणार नाही, असे म्हणत केले सांत्वन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 15:08 IST2025-05-22T15:05:00+5:302025-05-22T15:08:53+5:30

मला कल्पना दिली असती तर त्यावेळी मी लग्नच होऊ दिलं नसतं. मात्र आता वैष्णवीला न्याय मिळवून देणार, अस आश्वासन अजित पवार यांनी वैष्णवीच्या आई-वडिलांना दिल.

Vaishnavi Hagawane Death Case I will stand by your side and give justice to Vaishnavi; Ajit Pawar spoke to Kaspate family over phone | वैष्णवीच्या आई-वडिलांना अजित पवारांचा फोन; राजेंद्र हगवणेला सोडणार नाही, असे म्हणत केले सांत्वन

वैष्णवीच्या आई-वडिलांना अजित पवारांचा फोन; राजेंद्र हगवणेला सोडणार नाही, असे म्हणत केले सांत्वन

- नारायण बडगुजर

पिंपरी :
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, राजेंद्र हगवणे याला आमच्या पक्षाचा पाठिंबा नाही. राजेंद्र हगवणेला सोडणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवीच्या आईवडिलांचे फोनवरून सांत्वन केले.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवनवीन बाबी समोर येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून कस्पटे कुटुंबियांची भेट घेण्यात आली. त्यावेळी अजित पवार यांनी फोनवरून वैष्णवी हिचे वडील आनंद उर्फ अनिल कस्पटे यांच्याशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. त्यावेळी वैष्णवीच्या आईवडिलांना अश्रू अनावर झाले.    

अजित पवार म्हणाले, ‘‘आपल्या मुलीने त्या मुलाशी लव्ह मॅरेज झाले होते तरीही तिला सासरच्यांनी त्रास दिला. कधीच तुम्ही कोणीही मला याबाबत सांगितले नाही. तसे सांगितले असते तर आपण वेळीच त्यात लक्ष घातलं असतं. दुसरी गोष्ट अशी की, माझा या गोष्टीशी दुरान्वयेही संबंध नाही हे तुम्हाला माहिती आहे. मात्र, तरीही माझ्या नावाने डंका पिटला जात आहेत. वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणाबाबत मला कळाल्यानंतर मी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याशी चर्चा केली. वैष्णवीचे बाळ तिच्या आईवडिलांकडे द्या. कस्पटे कुटुंब बाळाचा व्यवस्थित सांभाळ करतील, असे पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणातील सर्व संशयितांना अटक करण्याची सूचना केली आहे. पोलिसांची तीन पथके होती आणखी पथके वाढवण्यास सांगितले आहे. पाेलिसांनी वैष्णवीच्या पती, सासू आणि नणंदेला अटक केली आहे. सासरा राजेंद्र हगवणे फरार आहे. त्याला सोडणार नाही. आपल्या सोन्यासारख्या मुलीला त्यांनी संपवलं. नालायकांना मुलीला नांदवायचे नव्हते तर तिला माहेरी पाठवून द्यायचे होते. लव्हमॅरेज कशाला करतात?’’

दादा तुम्ही बोलला होतात...

वैष्णवी हगवणे हिचे वडील अनिल कस्पटे फोनवरून अजित पवारांना म्हणाले, ‘‘तरी दादा तुम्ही बोलला होतात की, ही गाडी हगवणेंनी मागितली की तुम्ही स्वखुशीने दिली. त्यावर मी म्हणालो की ही गाडी मी स्वत: स्वखुशीने दिली आहे. त्यांना मी प्रेमापोटी गाडी आणि इतर वस्तू दिल्या.

अजित पवार म्हणाले, मी तुमच्यासोबत आहे...

आईवडील मुलीवर आणि मुलावरही प्रेम करतात. त्यामुळे लग्नात आईवडील मुलीच्या लग्नात गाडी, फ्लॅट तसेच इतर वस्तू देतात. मी तुमच्यासोबत आहे. महिलांच्या न्यायासाठी मी पुढाकार घेत असतो. त्यामुळे मी या प्रकरणात तुमच्या बाजून आहे, असे अजित पवार यांनी अनिल कस्पटे यांना फाेनवरून सांगितले.

Web Title: Vaishnavi Hagawane Death Case I will stand by your side and give justice to Vaishnavi; Ajit Pawar spoke to Kaspate family over phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.