उत्कर्ष शिंदेच्या पवार भेटीने राष्ट्रवादीत अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 09:27 AM2019-08-24T09:27:09+5:302019-08-24T09:29:47+5:30

पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यभरातील राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी पक्षांतराचा सपाटा लावला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना आता कलाकार व अभिनेत्यांची भुरळ पडली आहे.

utkarsh shinde meets NCP Leader Sharad Pawar | उत्कर्ष शिंदेच्या पवार भेटीने राष्ट्रवादीत अस्वस्थता

उत्कर्ष शिंदेच्या पवार भेटीने राष्ट्रवादीत अस्वस्थता

Next
ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड शहरासह राज्यभरातील राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी पक्षांतराचा सपाटा लावला आहे.राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना आता कलाकार व अभिनेत्यांची भुरळ पडली आहे.डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी गायक व अभिनेता डॉ. उत्कर्ष शिंदे यांना पिंपरी या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातील उमेदवारीसाठी आवतण दिले आहे.

हणमंत पाटील

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यभरातील राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी पक्षांतराचा सपाटा लावला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना आता कलाकार व अभिनेत्यांची भुरळ पडली आहे. लोकसभेला अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी गायक व अभिनेता डॉ. उत्कर्ष शिंदे यांना पिंपरी या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातील उमेदवारीसाठी आवतण दिले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व डॉ. शिंदे यांची गुरुवारी मुंबईत भेट झाली. या भेटीमुळे राष्ट्रवादीच्या पिंपरी मतदारसंघातील इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

२००९ च्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये पिंपरी हा स्वतंत्र मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला. त्यानंतर पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे विजयी झाले. त्यामुळे पिंपरी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र, गत पंचवार्षिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत या मतदारसंघात शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांनी बाजी मारली. तसेच, अण्णा बनसोडे यांचा पराभव झाला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघातून अण्णा बनसोडे व माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ इच्छुक आहेत. राष्ट्रवादीतील दोन्ही इच्छुकांकडून मलाच पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारीचे संकेत मिळाल्याचा दावा केला जात आहे. 

पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादीतून बनसोडे व ओव्हाळ यांच्यात उमेदवारीवरून चुरस सुरू असताना अचानक डॉ. उत्कर्ष शिंदे यांना उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते व आयात उमेदवार असा नवा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा मुलगा अशीही डॉ. उत्कर्ष शिंदे यांची समाजात ओळख आहे. वडील व भाऊ आदर्श शिंदे यांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील वलयाचा फायदाही उत्कर्ष यांना होण्याची आशा आहे. 

राष्ट्रवादीला उमेदवारीसाठी अभिनेत्यांची भुरळ 

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात अभिनेता असलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीने हा गड जिंकला. एका बाजूला राष्ट्रवादीतून अनेक ज्येष्ठ नेते पक्षांतर करीत असताना पक्षश्रेष्ठींना अभिनेते व कलाकार यांची उमेदवारीसाठी भुरळ पडत आहे. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रयोग लोकसभेत यशस्वी झाल्याने राष्ट्रवादीकडून विधानसभेला अभिनेते व कलाकारांना उमेदवारीची शक्यता आहे. दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच मला उमेदवारीसाठी विचारणा केल्याचे गायक व अभिनेता डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

 लोकसभा निवडणुकीपूर्वी एकदा शरद पवार यांच्यासोबत उमेदवारीवरून चर्चा झाली होती. त्यानंतर शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनीही विधानसभेला उमेदवारीची ऑफर दिली आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा मुंबई येथे शरद पवार यांच्यासोबत पिंपरी व मोहोळ या विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून चर्चा झाली आहे. मात्र, अद्याप कोणत्या राजकीय पक्षातून व मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवायचे हे ठरविलेले नाही. 

- उत्कर्ष शिंदे, अभिनेता व गायक 
 

कोण आहे उत्कर्ष शिंदे

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा मुलगा व आदर्श शिंदे याचा भाऊ ही त्याची पहिला ओळख. मात्र, पुणे, मुंबई व लंडन येथे उच्च शिक्षण घेतले. एमडी फिजीशयन शिक्षण, पीजी इन लंडन, पुणे व पिंपरी येथेही शिक्षण. सध्या वैदयकीय व्यावसायाबरोबर गायन व अभिनेता म्हणून चित्रपटात काम. सामाजिक कार्याची आवड असल्याने राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा. मूळगाव मोहोळ मतदारसंघातील आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षण व मोठा मित्रपरिवार आहे. त्यामुळे मुंबई जन्मभूमी असलतरी पिंपरी-चिंचवडला कर्मभूमी मानतात.शिवसेनेनंतर राष्ट्रवादीकडूनही विधानसभेसाठी उमेदवारीचे आवतन. पिंपरी व मोहोळ या राखीव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

 

Web Title: utkarsh shinde meets NCP Leader Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.