पिंपरी-चिंचवड शहरातून चोरीला गेलेल्या ६८५ वाहनांचा लागेना शोध; चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 15:16 IST2020-12-17T15:15:07+5:302020-12-17T15:16:29+5:30
८४७ पैकी केवळ १६२ वाहने शोधण्यात पोलिसांना यश

पिंपरी-चिंचवड शहरातून चोरीला गेलेल्या ६८५ वाहनांचा लागेना शोध; चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच
नारायण बडगुजर-
पिंपरी : वाहनचोरट्यांनी पिंपरी-चिंचवड शहरात धुमाकूळ घातला आहे. गेल्या अकरा महिन्यांत ८४७ वाहनांची चोरी झाली. त्यातील केवळ १६२ वाहनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून ६८५ वाहने गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाहनचोरीतील आंतरराज्य तसेच काही स्थानिक टोळ्यांचा पर्दाफाश केला असला तरी वाहनचोरीचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे वाहनचालक धास्तावले आहेत.
खून, दरोडा आदी गंभीर गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगारांना जेरबंद करून अशा गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र चोरी, जबरी चोरी, वाहनचोरी आदी गुन्हे रोखण्यात तसेच त्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे चोरटे मोकाट आहेत. त्यात वाहनचोरटे मोठ्या संख्येने आहेत. घरासमोर तसेच सोसायटीच्या पार्किंगमधून वाहने चोरीला जात आहेत. तसेच औद्योगिक पट्ट्यात देखील चोरीचे सत्र सुरूच आहे. कंपनीच्या प्रवेशव्दारावरून दुचाकी चोरीचे प्रमाण चिंताजनक आहे. या वाहनचोरांचा कामगारांनी धसका घेतला आहे.
वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये सराईतांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अशा काही चोरट्यांच्या मुसक्या आवळून पाठ थोपटून घेतली. मात्र त्यानंतरही वाहनचोरीचे प्रकार थांबल्याचे आकडेवारीवरून दिसून येत नाही.
यंदा जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत चोरट्यांनी ७४६ दुचाकी चोरून नेल्या. त्यातील केवळ १३७ दुचाकींचा शोध लागला आहे. रिक्षा, टेम्पो आदी तीनचाकी १८ वाहने चोरून नेले. त्यातील केवळ चार वाहनांचा पोलिसांना शोध घेतला. चारचाकी ८३ वाहने चोरीला गेली असून त्यातील केवळ २१ वाहनांचा शोध लागला. त्याचप्रमाणे सायकल चोरीचे प्रकार वाढले आहेत. त्यातही उच्चभ्रू हाऊसिंग सोसायटीतून चोरट्यांनी आठ सायकल चोरी केल्या आहेत.
वाहनचोरी प्रकरणात गुन्हे शाखेकडून क्राइम मॅपिंग करण्यात आले आहे. तसेच वाहनचोरी रोखण्यासाठी पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांना सूचना केल्या आहेत. तसेच वाहनचोरीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी शोधपथक पुन्हा कार्यान्वित करण्याबाबत नियोजन सुरू आहे.
- सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा