two worker died in land slide in dapodi | दापाेडीत ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या दाेघांचा मृत्यू
दापाेडीत ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या दाेघांचा मृत्यू

पिंपरी : दापोडीतील आई उद्यानासमोरील जलनि:स्सारण वाहिनीच्या कामासाठी खोदलेल्या खड्यात गाडलेल्या पाचपैकी तीन जणांना वाचविण्यात यश आले असून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. अग्निशामक दल आणि आपत्तीव्यवस्थापानाचे पथक दाखल झाले आहे. खड्डा उकरण्याचे काम सुरू आहे.  ही घटना रविवारी पावणसातच्या सुमारास घडली.

दापोडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश कल्याण जमादार (वय २०, दापोडी), इश्वर बडगे, निखील गोगावले अद्यापही गाडले गेले असून सिताराम सुरवसे, सरोज पुंडे हे गंभीर जखमी झाले आहेत. दापोडीतून पुणे-मुंबई महामार्गाकडे जाण्यासाठी रस्ता पुलाच्या अलिकडे आई गार्डन आहे. गार्डनपासून गणेश इंग्लिश मेडीयम शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर महापालिकेच्या वतीने जलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सुमारे पंधरा ते वीस फुट खोल चर खोदले आहेत. अंधार पडल्यानंतरही येथे काम सुरू होते.

सायंकाळी पावणे सातच्या सुमारास जेसीबीच्या साह्याने रस्ता उकरण्याचे काम सुरू होते. तर काही कामगार खड्यातील माती काढत होते. त्यावेळी त्यामुळे रस्त्यावरच ढिगारा करून माती टाकली जात होती. त्यावेळी काही कामगार त्या ढिगाऱ्यावर उभे होते. अचानक ढिगारा ढासळल्याने चार कामगार खड्यात  गाडले गेले. त्यावेळी उर्वरित कामगारांनी जीव वाचविण्यासाठी आरडाओरडा केला. तर जेसीबी चालकांने घटनास्थळावरून धूम ठोकली. त्यानंतर यावेळी प्रत्यक्षदर्शिनी पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दल आणि महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थानास माहिती दिली त्यानंतर काहीवेळातच अग्शिनशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कामगारांना काढण्याचा प्रयत्न करीत असताना अग्निशामक दलाचाही एक कर्मचारी खड्यात पडला आहे. त्याला काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अंधारामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत.  जखमींना महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात दाखल केले आहे.

शोधकार्य सुरू
खड्डा अधिक खोल असल्याने एनडीआरएफच्या जवानांनाही पाचारण करण्यात आले आहे. गाडलेल्या कामगारांना काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.  महापालिकेच्या आपतकालीन विभागाचे प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, अग्निशामक विभागाचे ऋषिकांत चिपाडे, प्रताप चव्हाण यांचे पथक शोध कार्य करीत आहेत. रात्री पावणे नऊच्या सुमाराम एनडीआरएफ आणि आर्मीचेही पथक मदतीसाठी दाखल झाले आहे.

बघ्यांची गर्दी, शोधकार्यात अडथळा
घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली आहे. त्यामुळे शोधकार्यात अडथळा येत होता. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी याठिकाणी येणारा रस्ता बंद केला आहे. आपतकालीन विभागाचे प्रमुख ओमप्रकाश बहिवाल म्हणाले, ‘‘खड्यात कामगार पडल्याची माहिती मिळताच आपतकालीन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि आर्मीच्या पथकांच्या मदतीने मदत कार्य सुरू आहे. मदत करत असताना अग्शिनशामक दलाचा एक जवानही खड्यात पडला आहे. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.’’

Web Title: two worker died in land slide in dapodi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.