पुणे मुंबई रस्त्यावर दोन ट्रकचा अपघात; एकाचा मृत्यू
By प्रकाश गायकर | Updated: February 9, 2024 15:06 IST2024-02-09T15:06:19+5:302024-02-09T15:06:46+5:30
एका चालकाने ट्रक हयगयीने चालवत दुसऱ्या ट्रकला धडक दिली

पुणे मुंबई रस्त्यावर दोन ट्रकचा अपघात; एकाचा मृत्यू
पिंपरी : पुणे-मुंबई एक्सप्रेस रस्त्यावर पुणे शहराकडे येत असताना ट्रकने समोरील ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये समोरील ट्रक चालकाच्या साथीदाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि.८)पुणे मुंबई रस्त्यावर शिरगाव याठिकाणी घडली. रोशनलाल नारायणजी मिना (३०, राजस्थान) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी ट्रकचालक सावरलाल ईश्वरलाल नायक (वय ३२, रा. समेलिया, राजस्थान) यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ट्रकचालक अजय रमेश मिना (२०, राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्याकडील ट्रक (आर जे ०६ जी ३१०७) मुंबई पुणे एक्सप्रेस रोडने पुणे बाजूकडे चालवत येत होते. त्यावेळी संशयित आरोपी याने त्याच्या ताब्यातील ट्रक (आर जे २७ जीडी ८२२९) हयगयीने चालवत फिर्यादी यांच्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये फिर्यादी यांच्यासोबत असलेल्या रोशनलाल नारायणजी मिना यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.