बाजूला जाऊन सिगारेट ओढ म्हटल्याने दोघांवर ब्लेडने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 11:42 IST2025-02-10T11:42:35+5:302025-02-10T11:42:51+5:30
जफर अहमद शोहराबअली शाह (२८, रा. कुदळवाडी, चिखली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

बाजूला जाऊन सिगारेट ओढ म्हटल्याने दोघांवर ब्लेडने वार
पिंपरी : तीन मित्र अंडाभुर्जी खाण्यासाठी गेले. तिथे एक तरुण सिगारेट ओढत होता. बाजूला जाऊन सिगारेट ओढ, असे त्याला सांगितल्याने त्याने ब्लेडने दोघांवर वार करत खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. ७) रात्री साडेनऊच्या सुमारास कुदळवाडी, चिखली येथे घडली. पोलिसांनी संशयिताला अटक केली.
जफर अहमद शोहराबअली शाह (२८, रा. कुदळवाडी, चिखली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गणेश शिंदे (२४, रा. चिखली) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. ८) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुष्कर नेवाळे, उदय ताले अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश शिंदे आणि त्यांचे मित्र पुष्कर व उदय हे शुक्रवारी रात्री कुदळवाडी येथे अंडाभुर्जी खाण्यासाठी गेले होते. अंडाभुर्जी खात असताना तिथेच जफर हा सिगारेट ओढत होता.
त्याला ‘बाजूला जाऊन सिगारेट ओढ’, असे गणेश यांनी सांगितले. त्या कारणावरून जफर याने गणेश आणि त्यांच्या मित्रांसोबत वाद घातला. पुष्कर आणि उदय यांच्यावर ब्लेडने वार करत खून करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. पोलिस उपनिरीक्षक राजेश मासाळ तपास करीत आहेत.