Pimpri Chinchwad: तीन अपघातांत दोघांचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी
By विश्वास मोरे | Updated: June 17, 2024 18:23 IST2024-06-17T18:22:44+5:302024-06-17T18:23:13+5:30
चालकांच्या निष्काळजीपणामुळे तळेगाव दाभाडे, भोसरी आणि वाकड येथे घडलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू तर एक जखमी

Pimpri Chinchwad: तीन अपघातांत दोघांचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी
पिंपरी : तळेगाव दाभाडे, भोसरी आणि वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघाताच्या तीन घटना घडल्या आहेत. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एकाच्या पायावरून बस गेल्याने तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी रविवारी गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमाटणे फाटा येथे रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अपघात झाला. रस्ता ओलांडत असलेल्या वीरभद्र रामराव शिरोळे (वय ३८, रा. वराळे, ता. मावळ) यांच्या अंगावर मयूर जालिंदर साखरे (वय ३०, रा. हिंजवडी) याने त्याच्या ताब्यातील थार गाडी घातली. यामध्ये शिरोळे यांचा मृत्यू झाला. शिरोळे यांच्या पत्नीने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयूर साखरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रॅव्हल बसची तरुणाला धडक
भोसरी मधील गावजत्रा मैदानात खाजगी ट्रॅव्हल बसने एका तरुणाला धडक दिली. त्यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी हुसेनखा मेहताबखा पठाण (वय ४२, रा. काळेवाडी, पिंपरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बस चालक शुभम संजय सुरवसे (वय २५, रा. हडपसर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पठाण यांचा मुलगा गावजत्रा मैदानात नाश्ता करत असताना आरोपी सुरवसे याने त्याच्या ताब्यातील बस निष्काळजीपणे चालवत त्यास धडक दिली. बसचे चाक तरुणाच्या अंगावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.
बसचे चाक पायावरून गेल्याने गंभीर जखमी
डांगे चौक थेरगाव येथे ट्रॅव्हल बसचे चाक पायावरून गेल्याने एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी (१६ जून) सकाळी सात वाजताच्या सुमारास घडला. निलेश ज्ञानशीन इनवाती (वय ३२) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. निलेश हे डांगे चौक परिसरात पायी रस्ता ओलांडत असताना त्यांना बसने धडक दिली. बसचे चाक त्यांच्या दोन्ही पायांवरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी बस चालक अनिल जगन तेली (वय ४७, रा. जळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.