पवना, मुळा, इंद्रायणीच्या पात्रातील वृक्षतोड थांबलीच पाहिजे! विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचे आंदोलन
By विश्वास मोरे | Updated: March 25, 2025 20:11 IST2025-03-25T20:11:01+5:302025-03-25T20:11:23+5:30
बांधकाम आणि कृत्रिम सौंदर्यीकरणाच्या नावाखाली वृक्षतोड, प्राण्या-पक्ष्यांचे अधिवास नष्ट करणे आणि पर्यावरणाला धोका निर्माण करणे हे मान्य नाही

पवना, मुळा, इंद्रायणीच्या पात्रातील वृक्षतोड थांबलीच पाहिजे! विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचे आंदोलन
पिंपरी : 'पवना, मुळा, इंद्रायणी वृक्षतोड थांबलीच पाहिजे' असे फलक झळकवून आमदार अमित गोरखे यांनी विधानभवनात प्रवेश केला. पवना, मुळा, इंद्रायणी नदी पात्रातील वृक्षतोड थांबलीच पाहिजे, नदी विकास प्रकल्पाला विरोध दर्शविला. पिंपरी-चिंचवड ,मावळ हद्दीतील नदी विकास प्रकल्पाला पर्यावरणवादी संस्थांचा विरोध होत आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज विधानभवनामध्ये प्रवेश करताना आमदार अमित गोरखे यांनी 'वृक्षतोड थांबलीच पाहिजे' असे फलक हाती घेतले होते.
'वृक्षतोड थांबलीच पाहिजे', 'आधी नद्या स्वच्छ करा' आणि 'नद्या वाचवू, निसर्ग टिकवू, अशा घोषणा देत आमदार अमित गोरखे म्हणाले, पर्यावरण संरक्षणासाठी एकत्र येत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पाचशेहून अधिक सामाजिक संस्था या एकत्र येऊन संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरभर मानवी साखळीद्वारे आंदोलन सुरू असून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नदी विकास प्रकल्पाला विरोध आहे असे सांगत आहेत. पर्यावरणवादी संघटनांच्या पदाधिकारी यांच्या सूचनांचा विचार करूनच विकास करायला हवा. नद्यांचे नैसर्गिक स्वरूप अबाधित ठेवणे गरजेचे आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्यांचे संवर्धन ३० लाखांहून अधिक नागरिकांसाठी महत्त्वाचे आहे. बांधकाम आणि कृत्रिम सौंदर्यीकरणाच्या नावाखाली वृक्षतोड, प्राण्या-पक्ष्यांचे अधिवास नष्ट करणे आणि पर्यावरणाला धोका निर्माण करणे हे मान्य नाही.'