Torture of a wife to start a salon; Husband files crime | सलून सुरु करण्यासाठी बायकोचा छळ ; नवऱ्यावर गुन्हा दाखल  

सलून सुरु करण्यासाठी बायकोचा छळ ; नवऱ्यावर गुन्हा दाखल  

पिंपरी : सलून सुरु करण्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहितेकडे माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. यासाठी विवाहितेने नकार दिला असता आतील घराबाहेर हाकलून तसेच मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची फिर्याद वडगाव मावळ पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. हा प्रकार मे ते डिसेंबर 2019 या कालावधीत घडला.


याप्रकरणी 20 वर्षीय विवाहितेने वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती मयूर सोनवणे, सासू रेणुका सोनवणे (दोघे रा. वरसगाव पानशेत), नणंद कोमल तावरे (रा. वरसगाव पानशेत) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मयूर याचे 20 मे 2019 रोजी लग्न होणारे होते. काही घरगुती अडचणींमुळे ते लग्न होऊ शकले नाही. मात्र, ठरलेल्या दिवशी लग्न होण्यासाठी आरोपी मयूरच्या घरच्यांनी लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी फिर्यादी महिलेच्या घरच्यांना विनंती केली. मुलगा सलूनचा व्यवसाय करत असून तो न-हे आंबेगाव येथे राहत असल्याचे मुलीच्या घरच्यांना सांगण्यात आले. त्यावर महिलेच्या घरच्यांनी संमती दर्शवून फिर्यादी महिला आणि आरोपीचा विवाह केला. विवाह झाल्यानंतर तीन महिने संसार व्यवस्थित चालला.


त्यानंतर, फिर्यादी यांना आरोपी पतीचा सलूनचा व्यवसाय नसून तो मामाच्या दुकानात काम करत असल्याचे समजले. पतीला दारूचे व्यसन असल्याचेही समजले. याबाबत फिर्यादिंनी विचारणा केली असता त्यांना आरोपी पतीने मारहाण केली. फिर्यादीला घराबाहेर ठेवले. विवाहितेकडे सलून दुकान सुरु करण्यासाठी दोन लाख रुपये माहेरहून घेऊन येण्याची मागणी केली. यासाठी विवाहितेने नकार दिला असता आरोपींनी त्यांना मारहाण केली. आरोपी पती, सासू आणि नणंद या तिघांनी मिळून फिर्यादी महिलेला घरगुती कारणावरून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला.वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Torture of a wife to start a salon; Husband files crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.