काळाचा घाला; लगीनघाई सुरु असताना टाकीत बुडून आईचा मृत्यू;चिंचवड मोहननगर येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:45 IST2025-10-31T17:45:01+5:302025-10-31T17:45:58+5:30
- आशा या सोसायटीच्या पार्किंगमधील जमिनीखालच्या टाकीतून पाणी काढण्यासाठी गेल्या. त्यांनी झाकण उघडून बादली टाकली, मात्र पाणी खोल होते.

काळाचा घाला; लगीनघाई सुरु असताना टाकीत बुडून आईचा मृत्यू;चिंचवड मोहननगर येथील घटना
पिंपरी : तीन दिवसांवर मुलाचे लग्न असल्याने घरात लगीनघाई सुरु होती. स्वयंपाकासाठी पाणी आणण्यासाठी गेलेल्या आईचा टाकीत बुडून मृत्यू झाला. ही घटना चिंचवड येथील मोहननगर परिसरात सोसायटीत घडली. आशा संजय गवळी (वय ५२, रा. मोहननगर, चिंचवड) असे त्या दुर्दैवी मातेचे नाव आहे. ‘सुवासिनींचे जेवण’ अर्धवट राहिले. या घटनेने परीसरात शोककळा पसरली आहे.
गवळी कुटुंब हे मूळचे इंदापूर तालुक्यातील असून सध्या मोहननगरात वास्तव्यास आहे. आशा या गृहिणी तर त्यांचे पती संजय पुण्यातील शाळेत कर्मचारी आहेत. त्यांना दोन मुले असून ते इंजिनियर आहेत. मुलांना इंजिनियर बनविण्यासाठी गवळी कुटुंबाने कष्ट घेतले. मोठ्या मुलाचे लग्न झाले आहे. तर छोट्या मुलाचे लग्न येत्या ४ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथे ठरले होते. ३ नोव्हेंबरला साखरपुड्याचा कार्यक्रम होणार होता. त्यामुळे घरात लग्नाचे धार्मिक विधी सुरू होते. लगीनघाई सुरु होती.  लग्नासाठी कपडे, दागिने, मानपानाचे साहित्य अशी तयारी सुरु होती. 
गवळी कुटुंबाने आज शुक्रवारी देवीचा वार असल्याने घरात ‘सुवासिनींचे जेवण’ ठेवले होते. त्यामुळे सकाळपासूनच स्वयंपाकाची तयारी सुरू होती. त्यामुळे पाणी कमी पडले म्हणून आशा या सोसायटीच्या पार्किंगमधील जमिनीखालच्या टाकीतून पाणी काढण्यासाठी गेल्या. त्यांनी झाकण उघडून बादली टाकली, मात्र पाणी खोल होते.  
आई दिसत नसल्याने शोध
बादलीत पाणी घेताना त्यांचा तोल गेला आणि त्या टाकीत पडल्या. त्यानंतर सुमारे वीस मिनिटांनी त्यांचा मुलगा आई दिसत नसल्याने शोध घेऊ लागला. टाकीचे झाकण उघडे दिसल्याने त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने आत पाहिले असता आई पाण्यात बुडालेली दिसली आणि त्याने आक्रोश केला. यावेळी आजूबाजूचे लोक जमा झाले. सर्वानी आशा यांना बाहेर काढले. त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याचे सांगत वायसीएम रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, उपचारापूर्वीच आशा यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या घटनेने मोहननगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  मुलाचे हात पिवळे करण्याआधीच आईचा दुर्दैवी अंत झाला, या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.