व्यावसायिकाला ठार मारण्याची धमकी; पिंपरीत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेच्या मुलावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 13:15 IST2022-06-20T13:14:45+5:302022-06-20T13:15:05+5:30
न्यायालयात साक्ष देण्यापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून व्यावसायिकाच्या पत्नीचा विनयभंग केला

व्यावसायिकाला ठार मारण्याची धमकी; पिंपरीत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेच्या मुलावर गुन्हा दाखल
पिंपरी : न्यायालयात साक्ष देण्यापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून व्यावसायिकाच्या पत्नीचा विनयभंग केला. हा प्रकार ५ जून रोजी रात्री अकराच्या सुमारास घडला. उद्योजक विकास ताकवणे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पिंपरी-चिंचवड येथील माजी नगरसेविका नंदा ताकवणे यांचा मुलगा उद्योजक रविराज ताकवणे याच्या विरोधात याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी प्राधिकरण निगडी येथील एका व्यावसायिकाने रविवारी (दि. १९) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योजक रविराज विकास ताकवणे याच्या विरोधात मुंबई उच्चन्यायालयात खटला चालू आहे. त्यात साक्ष देण्यापासून परावृत्त करण्याच्या दुष्ट उद्देशाने रविराज ताकवणे याने फिर्यादी व्यावसायिकाला धाकदपटशा व शिवीगाळ केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीच्या मोबाईलवर अश्लील व अपमानास्पद शब्द वापरून मेसेज पाठवले. फिर्यादी व्यावसायिकाच्या पत्नीचे चारित्र्यहनन करण्याच्या दुष्ट हेतूने अश्लील भाषेत व्हाटसअपवर मेसेज पाठवले. ते मेसेज फिर्यादीच्या पत्नीने वाचल्याने त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. त्यांचा विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे तपास करीत आहेत.