दिल्ली येथील मरकज कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्यांनी तपासणी करून घ्या : श्रावण हर्डीकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 20:35 IST2020-04-06T20:34:56+5:302020-04-06T20:35:17+5:30
त्यामुळे शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता.. कुटुंबाला देखील त्याचा धोका

दिल्ली येथील मरकज कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्यांनी तपासणी करून घ्या : श्रावण हर्डीकर
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. मरकज निजामुद्दीन येथे आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक परिषदेकरिता दिल्ली येथे उपस्थित राहिलेल्या शहरातील नागरिकांपैकी काही व्यक्तींना व त्यांचे संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी आपली तपासणी करून घ्यावी, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणीसाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे. हर्डीकर म्हणाले, पुणे व पिंपरी चिंचवडमधून मरकज निजामुद्दीन येथे आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक परिषदेकरिता अनेकजण गेले होते . अद्यापही धार्मिक परिषदेकरिता उपस्थित राहिलेले अनेक नागरिक त्यांची ओळख उघड करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्या कुटुंबाला देखील त्याचा धोका संभावतो. आजमितीपर्यंत शहरातील सर्व नागरिकांनी मनपा प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे व यापुढेही अशाच प्रकारचे सहकार्य अपेक्षित आहे.
पिंपरी चिंचवड शहराचे रहिवाशी असलेल्या सर्व नागरिकांना महानगरपालिकेमार्फत आवाहन करण्यात येते की, जर आपणापैकी कोणीही मरकज, निजामुद्दीन येथे आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक परिषदेकरिता दिल्ली येथे उपस्थित राहिला असाल तर आपण स्वत: पुढाकार घेवून महापालिकेच्या रुग्णालयामध्ये त्याबाबतची माहिती द्यावी. तसेच आवश्यकतेनुसार तपासणी करुन घ्यावी. आपल्या सदर कृत्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यास हातभार लागणार आहे. यासाठी महानगरपालिकेचा हेल्पलाईन (८८८८००६६६६) या क्रमांकावर संपर्क साधावा.