Pimpri Chinchwad: अरे देवा! चोरांनी CCTV सुद्धा सोडले नाहीत; २ वर्षांत कॅमेऱ्यांच्या दीड हजार बॅटरी चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 12:05 IST2024-12-23T12:05:11+5:302024-12-23T12:05:22+5:30

पिंपरी चिंचवडमध्ये कोट्यवधींचा खर्च करून बसवलेले सीसीटीव्हीच्या चोऱ्यांवर अंकुश लावण्यास महापालिकेसह पोलिस प्रशासनही अपयशी

Thieves didn't even leave CCTV 1500 camera batteries stolen in 2 years IN pimpri chinchwad | Pimpri Chinchwad: अरे देवा! चोरांनी CCTV सुद्धा सोडले नाहीत; २ वर्षांत कॅमेऱ्यांच्या दीड हजार बॅटरी चोरीला

Pimpri Chinchwad: अरे देवा! चोरांनी CCTV सुद्धा सोडले नाहीत; २ वर्षांत कॅमेऱ्यांच्या दीड हजार बॅटरी चोरीला

पिंपरी : शहराच्या सुरक्षेसाठी कोट्यवधींचा खर्च करून बसवलेल्या शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या बॅटरी चोरीला जात असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. २१) निगडी-प्राधिकरणात उघडकीस आला आहे. दोन वर्षांत जवळपास दीड हजार बॅटरी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या चोऱ्यांवर अंकुश लावण्यास महापालिकेसह पोलिस प्रशासनही अपयशी ठरत आहे.

महापालिका हद्दीतील झपाट्याने विकसित होत असलेल्या पिंपळे-सौदागरसह जुनी सांगवी, पिंपळे गुरव, मोशी, प्राधिकरण आणि पिंपरी चौकातून गेल्या वर्षभरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या बॅटरी चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, स्मार्ट सिटीने ठेकेदारामार्फत बसवलेल्या सीसीटीव्हीपैकी निम्मे कॅमेरे सध्या सुरू आहेत आणि त्याच्याही बॅटरी चोरीला गेल्याने पोलिसांना तपासात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

बॅटरीच चोरीला...

आतापर्यंत अनेक गुन्ह्यांच्या तपासावेळी आरोपी आणि त्यांनी वापरलेली वाहने कुठून कुठे गेली, हे पोलिसांना समजण्यात अडसर येत होता. सीसीटीव्ही बंद, कॅमेऱ्यांची दृश्यमानता कमी, रेकॉर्ड उपलब्ध करण्यासाठी करावा लागणारा कागदोपत्री पुराव्यांचा अभाव अशी कारणे दिली जात होती. मात्र, आता चौकात लावलेल्या ८ ते १० कॅमेऱ्यांसाठी तेथेच एक बॉक्समध्ये बॅटरी ठेवली जाते; पण चोरट्यांकडून या बॅटरी चोरीचे धाडस केले जात असल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

तपासल्यावर कळतं कॅमेरा बंद आहे...

कोट्यवधींचा खर्च करून स्मार्ट सिटीअंतर्गत सीसीटीव्ही बसवले जात आहेत; परंतु रस्त्यावर लावलेल्या या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या बॅटरी नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत अनेक ठिकाणांहून चोरीला गेल्या आहेत. एखादी घटना घडल्यावर अथवा ठराविक कामांसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग तपासण्यासाठी आणि देखभालीसाठी कर्मचारी गेल्यावर बॅटरी नसल्याने कॅमेरे बंद असल्याचे उघड झाले आहे.

नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येत नाही का?

शहरातील सीसीटीव्ही हे करसंकलन विभागाच्या स्थानिक कार्यालयात जोडण्यात आले आहेत. तेथून निगडी येथील कमांड कंट्रोल रूममध्ये हे कॅमेरे जोडण्यात आले आहेत. या कमांड कंट्रोल रूममध्ये एक पोलिस उपनिरीक्षक आणि तीन कर्मचारी २४ तास उपस्थित असतात. वाहतूक पोलिस याच कॅमेऱ्यांत पाहून नियमभंग करणाऱ्यांवर लक्ष ठेवून कारवाई करीत आहेत. मात्र, कमांड कंट्रोल रूम आणि वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात बसून नागरिकांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची बॅटरी चोरीला जात असल्याचे लक्षात का आले नाही, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही...

शहरातून दर दोन-तीन दिवसाला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची बॅटरी चोरी होण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, स्मार्ट सिटीचे संचालक किरणराज यादव यांना याबाबत विचारले असता, त्यांना याबाबत काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील सीसीटीव्हींची संख्या - ठिकाणे - खर्च (रु.)

पिंपरी-चिंचवड महापालिका (पहिला टप्पा) - २ हजार ४९० - ४६० - १४७ कोटी

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड - ३ हजार - १,००० - सुमारे २५० कोटी

पिंपरी-चिंचवड महापालिका (दुसरा टप्पा) - २ हजार ४९० - ४६० - १४७ कोटी

Web Title: Thieves didn't even leave CCTV 1500 camera batteries stolen in 2 years IN pimpri chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.