Pimpari-Chinchwad Crime| पिंपरी-चिंचवडमध्ये चोरट्यांनी गोडाऊन फोडून पळविला 3 लाखांचा किराणा माल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 17:27 IST2022-01-29T17:23:56+5:302022-01-29T17:27:33+5:30
वाकड आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल...

Pimpari-Chinchwad Crime| पिंपरी-चिंचवडमध्ये चोरट्यांनी गोडाऊन फोडून पळविला 3 लाखांचा किराणा माल
पिंपरी : अज्ञात चोरट्यांनी दुकाने फोडून लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला. यात तीन लाख १३ हजार ४०९ रुपयांचा किराणामाल तसेच रोकड चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी वाकड आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. २८) घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले.
सुजाराम वेनाराम सिरवी (वय ३८, रा. विजय नगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिरवी यांचे काळेवाडी येथील शिवाजी चौक येथे नॅशनल ट्रेडर्स नावाचे किराणा मालाचे दुकान तसेच गोडाऊन आहे. फिर्यादीने गुरुवारी (दि. २७) रात्री साडेनऊच्या सुमारास दुकान व गोडाऊन बंद केले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे शटर उचकटून तीन लाख १३ हजार ४०९ रुपये किमतीचा किराणामाल व फिर्यादीच्या खात्यामधील ट्रांजेक्शनद्वारे ८० हजार रुपये, असा एकूण तीन लाख ९३ हजार ४०९ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शुक्रवारी (दि. २८) सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आला.
दीपक बाळासाहेब पिंजण (वय ३२, रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. किनई, ता. हवेली) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी कृपा मेडिकल श्री गणेश मेडिकल व रिलायन्स स्मार्ट पॉइंट मॉलमध्ये शटरचे कुलूप तोडून प्रवेश केला. कॅश काउंटरमधील चार हजारांची रोकड, श्री गणेश मेडिकलमधील एक हजारांची रोकड चोरली. तसेच रिलायन्स स्मार्ट पॉइंट मॉल या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. अज्ञात चोरट्यांनी दुकानातील दोन दरवाजे तोडून कॅश काउंटरचे रिकामे लोखंडी दोन ड्राॅवर चोरून नेले. मावळ तालुक्यातील मौजे वराळे येथे गुरुवारी (दि. २७) रात्री साडेनऊ ते शुक्रवारी (दि. २८) सकाळी सकाळी साडेनऊ या कालावधीत हा प्रकार घडला.