मावळ तालुक्यात जीबीएसचा रुग्ण नाही; तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून काळजी घेण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 10:11 IST2025-02-14T10:10:50+5:302025-02-14T10:11:19+5:30
जीबीएसबाबत अफवा पसरविणे टाळावे आणि आरोग्य अधिकाऱ्यांना सहकार्य करावे

मावळ तालुक्यात जीबीएसचा रुग्ण नाही; तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून काळजी घेण्याचे आवाहन
वडगाव मावळ : मावळ तालुक्यात गुइलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) आजाराचे रुग्ण आढळून आलेले नाहीत. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शॅरन सोनवणे यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यात जीबीएसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्या अनुषंगाने मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शॅरन सोनवणे यांनी मावळ तालुक्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना पत्र पाठवून गावात जनजागृती करून उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
‘आरोग्य संस्थेशी संपर्क साधा’
जीबीएसबाबत अफवा पसरविणे टाळावे आणि आरोग्य अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला जीबीएसची लक्षणे आढळली, तर ताबडतोब नजीकच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन मावळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोनावणे यांनी केले आहे.
या उपाययोजना करा
- पाणी उकळून प्यावे.
- भाज्या आणि फळे पूर्णपणे धुऊन घ्यावीत.
- कच्चे किंवा कमी शिजलेले अन्न, खाद्यपदार्थ टाळावे.
- खाण्यापूर्वी आणि स्वच्छतागृह वापरल्यानंतर साबण व पाण्याने हात धुवावा.
जीबीएस आजाराचा मावळ तालुक्यात अद्याप प्रादुर्भाव झालेला नाही. हा बरा होणारा आजार असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. - कुलदीप प्रधान, प्रशासक तथा गटविकास अधिकारी, मावळ पंचायत समिती