बावधनमध्ये गाडी बाजूला न घेतल्याने मारहाण करत महिलेचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 09:59 IST2022-08-01T09:58:53+5:302022-08-01T09:59:44+5:30
तीन जणांना अटक...

बावधनमध्ये गाडी बाजूला न घेतल्याने मारहाण करत महिलेचा विनयभंग
पिंपरी : गाडी बाजूला न घेतल्याने महिलेला मारहाण केली. तसेच गैरवर्तन करून विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली. ही घटना शनिवारी (दि. १०) सकाळी दहाच्या सुमारास बावधन बुद्रुक येथे घडली.
पदमसिंह हेमंत पाटील (वय २२, सध्या रा. हिंजवडी, मूळगाव कराड, जि. सातारा), अनिकेत रामदास हात्ते (वय २३), विशाल सदानंद सुटाके (वय २२, दोघेही रा. वारजे माळवाडी, पुणे), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने रविवारी (दि. ३१) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिरत दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांचे काम संपवून घरी जात होत्या. त्यावेळी आरोपींनी जोरात हार्न दिला असता फिर्यादीने गाडी बाजूला घेतली नाही. या गोष्टीचा राग आल्याने पदमसिंह पाटील याने त्याची गाडी फिर्यादीच्या गाडीच्या पुढे नेऊन थांबवली. त्यानंतर फिर्यादीला शिवीगाळ करून आरोपींनी मारहाण केली. फिर्यादी सोबत गैरवर्तन करून त्यांच्या मनास लज्जा निर्माण केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ तपास करीत आहेत.