पत्नी नांदायला येत नाही; मेहुण्यावर कटरने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 09:27 IST2022-09-23T09:27:40+5:302022-09-23T09:27:46+5:30
पिंपरी : पत्नी नांदत नसल्याच्या वादातून एकाने मेहुण्यावर हल्ला केला. यात मेहुण्याला कटरने वार केले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक ...

पत्नी नांदायला येत नाही; मेहुण्यावर कटरने वार
पिंपरी : पत्नी नांदत नसल्याच्या वादातून एकाने मेहुण्यावर हल्ला केला. यात मेहुण्याला कटरने वार केले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. ही घटना मंगळवारी (दि. २०) रात्री साडेदहाच्या सुमारास ज्योतिबा नगर, काळेवाडी येथे घडली.
ज्ञानेश्वर (वय ३०, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) असे जखमी झालेल्या मेहूण्याचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने बुधवारी (दि. २१) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सचिन शिवाजी आतकरे (वय ३०, रा. मु. पो. सारने-सांगवी, ता. केज, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेचा जावई आहे. फिर्यादी महिलेची मुलगी असलेली आरोपीची पत्नी नांदायला जात नाही. फिर्यादी या आपल्या पत्नीला नांदायला पाठवत नाही, असा आरोपीला फिर्यादी यांच्यावर संशय आहे. तसेच, आरोपीने गाडी जाळल्याची केस ज्ञानेश्वर हा मागे घेत नसल्याचा रागही आरोपीच्या मनात होता. या कारणावरून आरोपीने मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ज्ञानेश्वर याच्या गळ्यावर कटरने वार करीत त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद आहे.