शहरातील हवेची गुणवत्ता तपासणार, प्रदूषण रोखण्यासाठी पथक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 20:36 IST2024-12-11T20:35:15+5:302024-12-11T20:36:52+5:30
प्रदूषणाबाबत पाळत ठेवण्यासाठी पथक नेमले जाणार आहे. त्याची गस्त रात्रं-दिवस असणार आहे.

शहरातील हवेची गुणवत्ता तपासणार, प्रदूषण रोखण्यासाठी पथक
- विश्वास मोरे
पिंपरी : पिंपरी- चिंचवड महापालिकेने शहरातील हवा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’ प्रकल्पाची सुरुवात केली आहे. त्यातून या शहराची हवेची गुणवत्ता तपासली जाणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हवेच्या गुणवत्ता निरीक्षण आणि त्यावर उपाययोजनांची आखणी करण्यात येणार आहे. प्रदूषणाबाबत पाळत ठेवण्यासाठी पथक नेमले जाणार आहे. त्याची गस्त रात्रं-दिवस असणार आहे.
नॅशनल क्लीन एअर प्रोग्रामअंतर्गत महापालिका हद्दीमध्ये हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत. शहरातील हवेच्या गुणवत्तेच्या पातळीनुसार त्यावर उपाय करण्यात येणार आहेत. यामध्ये उपाययोजनांसाठी हवा गुणवत्ता निर्देशांकाचा आधार घेऊन त्याआधारे चार टप्पे केले आहेत. पर्यावरणीय प्रदूषणाचा सामना करण्यासाठी प्रदुषणाबाबत पाळत व दक्षता ठेवण्यासाठी, विविध प्रकारच्या कचरा – संबंधित व पर्यावरणीय उल्लंघनांवर नियंत्रण व गस्त घालण्यासाठी पथक निर्माण केले आहे. यामध्ये ३९ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.
काय आहे प्रणाली
ग्रॅप प्रणालीच्या दोन, तीन व चार या टप्प्यांतर्गत सुधारित हवेच्या गुणवत्तेचा अंदाज हे सी-डॅकच्या ‘निर्णय समर्थन प्रणाली’ नुसार हवेच्या गुणवत्तेच्या अंदाजांवर तीन दिवस अगोदर सुरू केले जातील. सुचविलेले उपाय किमान १५ दिवसांसाठी किंवा हवा गुणवत्ता निर्देशांकमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येईपर्यंत लागू करण्यात येतील. महापालिका सी-डॅकच्या अंदाजानुसार, शहराच्या सर्व भागामधील पीएम २.५, पीएम १०, एनओ एक्स, एसओ एक्स सारख्या प्रदूषकांवर लक्ष केंद्रित करणार आहे. वाहनांच्या प्रदूषणाची कठोर देखरेख ठेवण्यासाठी महत्वाची यंत्रणा निर्माण केली आहे. औद्योगिक आणि बांधकाम प्रदूषणावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यामध्ये ३२ क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसह ती आठ वॉर्डांमध्ये, उल्लंघनाच्या सदैव निरीक्षणासाठी तैनात केली आहे.
काय आहेत चार टप्पे
१) रस्त्यावरील धूळ नियंत्रित करणे, बेकायदेशीर कचऱ्याची विल्हेवाट लावणे, वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
२) डिझेल जनरेटरवरील निर्बंध, रस्त्यांची स्वच्छता आणि सार्वजनिक वाहतुकीचा प्रचार यांचा समावेश आहे.
३) अत्यंत प्रदूषण करणारे उद्योग बंद करण्यात येणार, वाहनांच्या प्रतिबंधात्मक क्षेत्र तयार करुन उल्लंघनावर कठोर दंड आकारण्यात येणार.
४) प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वाहन बंदी, संभाव्य शाळा बंद आणि कडक दंड लागू करण्यात येणार.
''शहराला प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपक्रम सुरु करणे म्हणजे शहराला प्रदुषणमुक्त करण्याच्या प्रक्रियेमधील एक मैलाचा दगड आहे. प्रगत तंत्रज्ञान, वास्तविक देखरेख आणि नागरिकांचा सहभागासह आम्ही शाश्वत विकासाला चालना देत आमच्या नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याचे ध्येय ठेवले आहे. ''-शेखर सिंह, आयुक्त
“उपक्रमामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून वास्तविक देखरेखची अंमलबजावणी करण्यात येते. यामुळे प्रदूषण होणाऱ्या घटकांवर प्रभावीपणे कारवाई करण्यास मदत होत असून हा प्रकल्प शहराच्या शाश्वत विकासासाठी महत्वाची भूमिका पार पाडेल.''
-संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता