शिक्षण विभागांत चाललंय काय ? शिक्षकानेच केली सेवानोंद पुस्तिकेत खाडाखोड;महापालिकेने केली फक्त बदलीची कारवाई
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: February 11, 2025 09:40 IST2025-02-11T09:39:48+5:302025-02-11T09:40:35+5:30
शिक्षकाचे नाव असून त्यांच्यावर महापालिकेने केलेल्या कारवाईने शिक्षक वर्तुळात आश्चर्य व्यक्त

शिक्षण विभागांत चाललंय काय ? शिक्षकानेच केली सेवानोंद पुस्तिकेत खाडाखोड;महापालिकेने केली फक्त बदलीची कारवाई
- ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी : महापालिकेत माध्यमिक शाळेच्या शिक्षकाने लवकर बढती मिळावी, यासाठी सेवाज्येष्ठता यादीतील सेवा पुस्तिकेच्या नोंदीतच खाडाखोड केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, त्या शिक्षकावर महापालिकेने कारवाई न करता फक्त त्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. अंकुश रामराव चव्हाण असे या शिक्षकाचे नाव असून त्यांच्यावर महापालिकेने केलेल्या कारवाईने शिक्षक वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापालिकेने २ फेब्रुवारी २०२४ ला सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करत त्यामध्ये काही दुरुस्ती असेल, तर महापालिकेच्या शिक्षण विभागास कळवावे, असे सांगितले होते. त्या यादीतील अंकुश चव्हाण यांनी त्यांच्या सेवाज्येष्ठता यादीतील रुजू तारीख १६ ऑगस्ट २०१० अशी चुकीचे असल्याची सांगत हरकत घेतली होती. तसेच ते रुजू असलेल्या महापालिकेच्या शाळेतील मुख्याध्यापकांकडून शिक्षण विभागाकडे शिफारस केली होती.
महापालिकेच्या चौकशी समितीने यासंदर्भात पडताळणी केली असता. त्यांची सेवा पुस्तिकेत नोंद केल्याची तारीख १६ ऑगस्ट २०१० हीच असून त्यामध्ये त्यांनी खाडाखोड करून २६ जुलै २०१० केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत बदली केली.
शिक्षकांने केली दिशाभूल...
अंकुश चव्हाण यांची महापालिका शिक्षण सेवेत १६ ऑगस्ट २०१० ही आहे. मात्र, त्यांनी त्यात खाडाखोड करून १६ जुलै २०१० केली होती. महापालिकेने सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर हरकत घेत महापालिकेचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
शिक्षण विभागांत चाललेय काय?
महापालिकेतील शिक्षण विभागात नस्ती गायब होणे, शिक्षक संघटनांच्या दबावात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे आदेशही परत घेण्याचे प्रकार घडले आहेत. सेवाज्येष्ठता यादी अथवा इतर दफ्तरी काम महापालिकेच्या लिपिकांचे असते. त्यात शिक्षक नोंद कशी काय बदलली जाऊ शकते. नेमकं शिक्षण विभागात चाललंय काय असा सवाल उपस्थित होत आहे.