आगीचे लोळ आणि सायरनचा आवाज... अन् सर्वाच्या काळजाचा ठोका चुकला...

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: May 7, 2025 18:47 IST2025-05-07T18:46:18+5:302025-05-07T18:47:55+5:30

- महापालिका प्रशासकीय भवनातील मॉकड्रिलचे यशस्वी आयोजन

The roar of fire and the sound of sirens and everyone heart skipped a beatSuccessful organization of mock drill at pimpari chinchwad Municipal Administrative Building | आगीचे लोळ आणि सायरनचा आवाज... अन् सर्वाच्या काळजाचा ठोका चुकला...

आगीचे लोळ आणि सायरनचा आवाज... अन् सर्वाच्या काळजाचा ठोका चुकला...

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज… सर्वत्र धुरांचे लोळ.. सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाचे फोन खणाणले… लगेच सर्वत्र सायरनचा आवाज… यावेळी उपस्थित दोन हजार नागरिक व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण….सर्वत्र धावाधाव सुरु… काहीतरी आपत्ती जनक घटना घडली म्हणून सुरक्षा यंत्रणेने तत्काळ चक्रे फिरवली...आणि अग्निशमन विभागाची वाहने त्वरीत पोहोचली आणि प्रशासकीय भवनात असलेल्या २ हजारांहून अधिक कर्मचारी, नागरिकांना इमारतीबाहेर काढण्यात आले. अवघ्या १५ मिनिटात भयावह परिस्थिती आटोक्यात आणली गेली.

देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम ठेवण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या प्रशासकीय भवनातील सुरक्षा यंत्रणा सज्जता तपासण्यासाठी मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त नागरिकांना मदत व मार्गदर्शन पोहचविण्याची खबरदारी म्हणून या मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते.

या सरावामध्ये नागरी संरक्षण वॉर्डन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पोलीस, अग्निशमन सेवा, तसेच राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना यांचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. सीमावर्ती भाग आणि महानगरांमध्ये महत्त्वाची पायाभूत सुविधा आच्छादन आणि नियंत्रण कक्षांच्या कार्यक्षमतेचीही चाचणी घेण्यात आली. या मॉकड्रिल मोहिमेमध्ये अग्निशमन विभागाच्या ४ वाहनांसह २० अधिकारी, कर्मचारी, ॲम्ब्युलन्सची ४ वाहने व १६ कर्मचारी तर सुरक्षा विभागाचे ५२ अधिकारी कर्मचारी ,पोलीस अधिकारी,कर्मचारी असे ३७ जण तसेच वाहतूक पोलीसांचे २४ जण, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे १ अधिकारी एनसीसी व राष्ट्रीय सेवा योजनेचे ४६ स्वयंसेवक, १८ आपदा मित्र यावेळी सहभागी झाले होते. 

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशातील वातावरण तणावाचे झाले असून त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह विभागाच्या वतीने देशभरात मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. आपत्ती कोणतीही पूर्वसूचना न देता येते, त्यामुळे अशा मॉकड्रिलच्या माध्यमातून यंत्रणांचे प्रशिक्षण आणि सज्जता वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात अशा अधिकाधिक मॉकड्रिल उपक्रमांचे आयोजन करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका सदैव कटिबद्ध राहील.

-तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Web Title: The roar of fire and the sound of sirens and everyone heart skipped a beatSuccessful organization of mock drill at pimpari chinchwad Municipal Administrative Building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.