Sant Tukaram Maharaj Palkhi 2025: संत तुकोबांच्या पालखीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी अडीचला होणार प्रस्थान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 11:25 IST2025-06-18T11:24:34+5:302025-06-18T11:25:48+5:30
यंदा वारीत पालखी रथाच्या पुढे २७ व रथाच्या मागे ३७० दिंड्या सहभागी होणार

Sant Tukaram Maharaj Palkhi 2025: संत तुकोबांच्या पालखीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी अडीचला होणार प्रस्थान
देहूगाव : आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज (बुधवार) दुपारी अडीच वाजता देहूतील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पालखी सोहळाप्रमुख दिलीपमहाराज मोरे यांनी दिली. ते म्हणाले की, यंदाचा ३४० वा पालखी सोहळा आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्यावतीने पूर्ण तयारी झाली आहे. चांदीच्या रथाला उजाळा देण्यात आला आहे. त्याला आठ कॅमेरे लावण्यात आले आहेत.
मंदिरात ४२ व मंदिराच्या बाहेरील भागात आठ कॅमेरे लावण्यात आले आहेत. मंदिराच्या कळसाला फुलांची सजावट करण्यात आली आहे. भजनी मंडपात सकाळी प्रस्थानापूर्वी देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन होईल. दुपारी अडीचला महाराजांच्या पादुकांचे पूजन होऊन पालखीचे प्रस्थान ठेवले जाणार आहे. यंदा वारीत पालखी रथाच्या पुढे २७ व रथाच्या मागे ३७० दिंड्या सहभागी होणार आहेत. यंदा संस्थानने तीन बैलजोड्या खरेदी केल्या आहेत. पालखीपुढे चालणारा मानाचा पेठ बाभुळगावकरांचा घोडा मंगळवारी चिखली येथे मुक्कामी असणार असून, बुधवारी प्रस्थानस्थळी उपस्थित होईल. अकलूजच्या मोहिते-पाटील यांचा घोडा बुधवारी सकाळी देहूत दाखल होईल व सोहळ्यात सहभागी होईल.
प्रस्थान सोहळ्याचा कार्यक्रम
पहाटे ५ : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व शिळामंदिरात महापूजा.
पहाटे ५:३० : वैकुंठस्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा.
सकाळी ६ : पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराजांच्या समाधीची महापूजा.
सकाळी ९ ते ११ : श्री तुकोबारायांच्या पादुकांची इनामदार वाड्यात महापूजा.
सकाळी १० ते १२ : अखंड हरिनाम सप्ताहाचे काल्याचे कीर्तन.
दुपारी २:३० : प्रस्थान सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम.
सायंकाळी ५ : पालखी मुख्य मंदिर प्रदक्षिणेसाठी भजनी मंडपातून बाहेर.
सायंकाळी ६:३० : इनामदार वाड्यात पहिला मुक्काम.