चादरीतील ‘त्या’ मृतदेहाचे रहस्य उलगडले; हिंजवडी पोलिसांकडून तपास सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 13:20 IST2024-12-19T13:20:10+5:302024-12-19T13:20:28+5:30
पंचनामा करण्यासाठी चादरीतून मृतदेह काढण्यास सुरुवात केली असता उपस्थितांनी ते पाहताच सर्वांनी डोक्याला हात लावला

चादरीतील ‘त्या’ मृतदेहाचे रहस्य उलगडले; हिंजवडी पोलिसांकडून तपास सुरु
पिंपरी : पोलिस ठाण्यात तक्रारदारांची गर्दी त्यात गस्तीची लगबग सुरू असतानाच हिंजवडीपोलिसांना बेवारस मृतदेहाबाबत माहिती मिळाली. एक मृतदेह चादरीमध्ये गुंडाळलेला असल्याचे समजले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. चादरीत मृतदेह नव्हे, तर मृत श्वान आढळला. त्यामुळे पोलिसांसह उपस्थितांनी डोक्याला हात लावला. शिंदे वस्ती येथे बुधवारी (दि. १८) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शिंदे वस्ती येथे चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली. हा नक्की खुनाचा प्रकार असल्याची खात्री पोलिसांना वाटत होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेची पथकेही घटनास्थळी दाखल झाली.
बघ्यांची गर्दी झाली होती. गर्दी कमी करण्याचे आवाहन करीत पोलिसांनी कामकाज सुरू केले. चादरीत गुंडाळलेल्या ‘त्या’ मृतदेहाचे फोटो काढण्यात आले. घटनास्थळी दुर्गंधीही येत होती. त्यानंतर पंचनामा करण्यासाठी चादरीतून मृतदेह काढण्यास सुरुवात केली. त्यासाठी मृतदेहावरील चादर बाजूला केली असता चादरीमध्ये मनुष्याचा मृतदेह नव्हे, तर मृत श्वान आढळून आला. यामुळे उपस्थित असलेल्या सर्वांनी डोक्याला हात लावला. या घटनेमुळे अनेकांना 'दृश्यम' चित्रपटाचीही आठवण झाली. मृत श्वानाला चादरीमध्ये गुंडाळून कोणी टाकले, का टाकले याबाबत हिंजवडी पोलिसांकडून तपास सुरू आहे.