'कामावर वेळेत ये..' म्हटल्याच्या कारणावरून बॉसला केली बेदम मारहाण; पिंपरीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 15:13 IST2024-11-25T14:50:41+5:302024-11-25T15:13:32+5:30
निघोजे गावच्या हद्दीतील एका कंपनीच्या घडली घटना

'कामावर वेळेत ये..' म्हटल्याच्या कारणावरून बॉसला केली बेदम मारहाण; पिंपरीतील घटना
पिंपरी : कंपनीतील वरिष्ठाने एका कामगाराला कामावर वेळेत ये, असे म्हटले. त्या कारणावरून कामगाराने वरिष्ठाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. २१) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास निघोजे गावच्या हद्दीतील एका कंपनीच्या समोर घडली.
मयूर हनुमंत शिर्के (३०, रा. हिवरे कुंभार, ता. शिरूर) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गणपत कुशाल लांडे (२६, रा. चिखली) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयूर शिर्के आणि गणपत लांडे हे दोघे एकाच कंपनीत काम करतात.
फिर्यादी शिर्के यांनी गणपतला फोन करून सायंकाळी सात वाजता वेळेत कामावर ये, असे सांगितले. गणपत याने आपल्याला रात्री एक वाजेल असे म्हटले. त्यामुळे तू कामावर आला नाहीस तरी चालेल, असे शिर्के यांनी सांगितले. त्या कारणावरून गणपत लांडे याने शिर्के यांना कंपनीच्या गेटवर अडवून बेदम मारहाण केली. ‘तुला जिवंत सोडणार नाही. तुझ्यावर व कंपनीवर खोट्या केस करतो’ अशी गणपत लांडे याने धमकी दिली.