थेरगावला मॅग्नेशिअम पावडरच्या कंपनीत भीषण स्फोट; आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 19:16 IST2021-04-24T19:12:08+5:302021-04-24T19:16:56+5:30
थेरगाव येथे पद्मजी पेपर मील समोर असलेल्या कंपनीत ही घटना घडली.

थेरगावला मॅग्नेशिअम पावडरच्या कंपनीत भीषण स्फोट; आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू
पिंपरी : मॅग्नेशिअमची पावडर तयार करणाऱ्या थेरगाव येथील कंपनीला शनिवारी (दि. २४) दुपारी साडेतीननंतर अचानक आग लागली. त्यामुळे पावरडने पेट घेतला आणि स्फोट झाला. स्फोटामुळे सिमेंटच्या भिंती कोसळल्या. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.
थेरगाव येथे पद्मजी पेपर मील समोर असलेल्या कंपनीत ही घटना घडली. याबाबत माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाचे किरण गावडे म्हणाले, पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केल्यास पावडर पेट घेऊन आणखी स्फोट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याचा वापर न करता वाळू व माती मारा करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ट्रक इत्यादीच्या साह्याने वाळू व माती मागवण्यात आली आहे. मात्र स्फोट सुरूच असल्याने वाळूचा मारा करून आग विझवण्यात अडथळे येत आहेत. केमिकल असल्याने आग सुरूच आहे.
चार किलोमीटरपर्यंत आवाज
सैन्य दलाकडील दारुगोळा व फटाके तयार करण्यासाठी मॅग्नेशिअम पावडरचा वापर होतो. ती पावडर थेरगाव येथील कंपनीत तयार केली जात होती. शनिवारी कामगार काम करीत असताना अचानक आग लागली. त्यामुळे कामगार लागलीच सुरक्षितपणे बाहेर पडले. त्यानंतर कंपनीत सोटांची मालिका सुरू झाली सायंकाळी साडेपाचपर्यंत स्फोट सुरूच होते. काही स्फोट मोठ्या तीव्रतेचे होते. त्यांच्या धमाक्यांचा आवाज चार किलोमीटरपर्यंत गेला.