'वेळ आल्यावर दाखवतो मी कोण आहे ते', धमकी देत तडीपार आरोपीची पोलिसालाच धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 13:32 IST2022-01-23T13:31:26+5:302022-01-23T13:32:26+5:30
तडीपार आदेशाचा भंग करून शहरात वावरत असलेल्या सराईतावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करून धमकी दिली

'वेळ आल्यावर दाखवतो मी कोण आहे ते', धमकी देत तडीपार आरोपीची पोलिसालाच धक्काबुक्की
पिंपरी : तडीपार आदेशाचा भंग करून शहरात वावरत असलेल्या सराईतावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करून धमकी दिली. पोलिसांनी सराईत गुन्हेगारास अटक केली असून त्याच्याकडून कोयता जप्त केला. वैभव नगर, पिंपरीगाव येथे शनिवारी (दि. २२) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
अतुल उर्फ चांड्या अविनाश पवार (वय २८, रा. मिलिंद नगर, पिंपरी), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस नाईक गणेश करपे यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवार याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. या आदेशाचा भंग करून आरोपी पवार हा शहरात वावरत होता. तसेच लोखंडी कोयता बाळगत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी पवार याने पोलिसांना धक्काबुक्की केली. तुम्ही चूक करताय माझी वेळ आल्यावर दाखवतो मी कोण आहे ते, असे बोलून धमकी देऊन आरोपी पोलिसांच्या अंगावर गेला. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून कोयता जप्त केला.