शिवसेना नेते लक्ष देत नाहीत, उमेदवार लादले जातात; शिवसैनिकांची राऊतांसमोर जाहीरपणे नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 13:59 IST2025-01-28T13:59:09+5:302025-01-28T13:59:29+5:30

आगामी २०२९ ला होणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील जागा शिवसेनेच्या वतीने स्वबळावर लढविण्यात येईल

Shiv Sena leaders do not pay attention, candidates are imposed; Shiv Sainiks openly express their displeasure in front of Raut | शिवसेना नेते लक्ष देत नाहीत, उमेदवार लादले जातात; शिवसैनिकांची राऊतांसमोर जाहीरपणे नाराजी

शिवसेना नेते लक्ष देत नाहीत, उमेदवार लादले जातात; शिवसैनिकांची राऊतांसमोर जाहीरपणे नाराजी

पिंपरी : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी चिंचवड येथे झाली. त्यामध्ये कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘पक्षाचे वरिष्ठ नेते पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष देत नाहीत, उमेदवार लादले जातात, चारपैकी एकही जागा मिळाली नाही, हे कार्यकर्त्यांचे दुर्दैव आहे,’ अशी नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. त्यावर 'विरोधकांची ताकद दाखवून द्या, आंदोलने करा, असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना केले.

विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक चिंचवड येथील एका हॉटेलमध्ये सोमवारी झाली. दुपारी चारला बैठक सुरू झाली. शिरूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी, त्यानंतर मावळ मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ मधील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या बैठकीस शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख सचिन अहिर, आदित्य शिरोडकर, मावळ संघटक संजोग वाघेरे, माजी आमदार गौतम चाबूकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहरप्रमुख सचिन भोसले, माजी शहरप्रमुख योगेश बाबर, युवानेते चेतन पवार आदी उपस्थित होते.

वरिष्ठ नेते लक्ष देत नाहीत, उमेदवार लादले जातात

लोकसभेला आणि विधानसभेला किती मतदान झाले, याविषयीचा आढावा घेतला. अपयशाची कारणे काय? याविषयी माहिती घेतली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी बोलण्यास सुरुवात केली. शिवसेनेचे वरिष्ठ नेते लक्ष देत नाहीत, उमेदवार लादले जातात. शिवसेनेच्या मूळ कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे. त्याचबरोबर आमचे विचार नेत्यांनी लक्षात घ्यावेत, अशी मते व्यक्त केली.

कार्यकर्त्यांची तीव्र नाराजी व्यक्त

पिंपरी चिंचवड कार्यकर्त्यांची बैठक सुरू झाली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पिंपरी, चिंचवड आणि मावळ, भोसरी या चारही मतदारसंघांमध्ये शिवसेनेची ताकद चांगली होती. मात्र, या जागांसाठी आम्ही मागणी केली होती. मात्र, एकही जागा नेत्यांनी दिली नाही, याबद्दल कार्यकर्ते तीव्र नाराज आहेत, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यानंतर राऊत यांनी मार्गदर्शन केले. राऊत म्हणाले, लोकसभा, विधानसभा निवडणूक झाली आहे. आता महापालिकेची निवडणूक आहे, त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत कार्यकर्त्यांनी सजग राहायला हवे.

शिरूर लोकसभा स्वबळावर

राऊत म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पक्ष उमेदवार ठरवतात. मात्र, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आपण सुचवाल, त्याच व्यक्तीला उमेदवारी देण्यात येईल. त्याचबरोबर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली राहील. आगामी २०२९ ला होणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील जागा शिवसेनेच्या वतीने स्वबळावर लढविण्यात येईल, त्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्ताच कामाला लागावे.

Web Title: Shiv Sena leaders do not pay attention, candidates are imposed; Shiv Sainiks openly express their displeasure in front of Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.