भोसरीतील शरद पवार गटाचे नगरसेवक घरवापसीच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 09:03 IST2025-01-18T09:01:52+5:302025-01-18T09:03:50+5:30
अजित पवार यांच्यासोबत बैठक : महापालिका निवडणुकीआधी नव्या घडामोडी

भोसरीतील शरद पवार गटाचे नगरसेवक घरवापसीच्या मार्गावर
पिंपरी : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणारे भोसरी मतदारसंघातील नगरसेवक आणि पदाधिकारी पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांची नुकतीच बैठक झाली आहे. माजी आमदार विलास लांडे यांनी अजित पवार यांच्याविषयी सूचक वक्तव्य केल्याने ही शक्यता अधिक वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पिंपरी-चिंचवड शहरातील नगरसेवकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याचा मार्ग स्वीकारला होता. भोसरी विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी राजीनामा देऊन शरदचंद्र पवार गट जवळ केला होता. त्यावेळी त्यांच्याबरोबर नगरसेवक आणि पदाधिकारी अशा सुमारे २८ जणांनी प्रवेश केला होता. त्यानंतर शरद पवार गटाकडून गव्हाणे यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र, ते पराभूत झाले.
का सुरू झाली चर्चा..?
राज्यात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता आली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. आता महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी दुसऱ्या गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. स्वगृही परतण्याची चर्चा झाली. दरम्यान, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. त्यामुळे घरवापसीची पुन्हा चर्चा सुरू झाली.
मी कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी राजस्थानला आलो आहे. मला शहरातील नवीन घडामोडींविषयी काही माहिती नाही. मी आल्यावर सर्व सहकाऱ्यांशी बोलेन. त्यानंतर सर्वानुमते भूमिका जाहीर करेन. - अजित गव्हाणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष.
विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवकांनी विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर अजित पवारांची भेट घेतली. त्यावेळी पवार यांनी त्यांचे मत ऐकून घेतले. अनेक नगरसेवक पुन्हा येण्यास तयार आहेत. कोणत्याही अटी-शर्तीविना प्रवेश करण्यास हरकत नाही, याबाबत पवार यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. - योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी, अजित पवार गट.
पिंपरी-चिंचवड शहराचा विकास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे झाला आहे. त्यांच्यामुळे ‘बेस्ट सिटी’ सन्मान मिळाला आहे. महापालिकेतही राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे. ते कार्यकर्त्यांना ताकद देतात. उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत अजित गव्हाणे यांच्यासह सर्वांनी यावे, यासाठी मी विनंती करणार आहे. - विलास लांडे, माजी आमदार