आम्ही सुरू केलेल्या योजना बंद होतील, अशी अफवा पसरविली जातीये; शिंदेंची विरोधकांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 15:31 IST2025-02-17T15:31:09+5:302025-02-17T15:31:43+5:30
समाजसेवेचा, जनसेवेचा व्रत असेल तर त्याचा विजय निश्चितच असतो, आम्ही संघर्ष करून विजय मिळवला

आम्ही सुरू केलेल्या योजना बंद होतील, अशी अफवा पसरविली जातीये; शिंदेंची विरोधकांवर टीका
पिंपरी : लोकसभेला फेक नेरेटिव्हमुळे अपयश आले. आता आम्ही सुरू केलेल्या योजना बंद होतील, अशी अफवा पसरविली जात आहे. सुरू केलेल्या योजना बंद होणार नाहीत अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिंचवड येथे दिली आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांच्या ‘संघर्षयोद्धा’ पुस्तक प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर स्वामी गोविंद देव गिरी महाराज, केंद्रीय सहकार, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील शेळके, महेश बालदी, राहुल कुल, उमा खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, ‘समाजसेवेचा, जनसेवेचा व्रत असेल तर त्याचा विजय निश्चितच असतो. बारणे यांनी स्थायी समिती सभापतिपदासाठी ४२ दिवसांचा संघर्ष केला. आम्हीही ठाण्यात महापौर निवडीवेळी सदस्यांना घेऊन देशभर फिरलो, संघर्ष केला आणि विजय मिळविला.
मावळे कधीही झुकत नाहीत - स्वामी गोविंद देव गिरी महाराज
धर्म हा सर्वगामी विषय आहे. आमचा निवडणुकीशी संबंध नसतो. मात्र, यावेळीची निवडणूक वेगळीच होती. तो धर्मावरील हल्ला आहे, अशी सगळ्यांची भावना होती. भगव्या झेंड्याकरिता सगळे एकत्र आले होते. महाराष्ट्र हा देशाचा आधार आणि महाराष्ट्राचा आधार मावळ आहे, कारण मावळे कधीही झुकत नाहीत, विकत नाहीत. भगवा झेंडा खांद्यावर घेऊन फडकवित ठेवणाऱ्या प्रत्येकाचा पाईक होण्यात मी धन्यता मानतो. राष्ट्र स्मरण चिरंतन व्हायला हवे. भगव्या झेंड्याला नमन. भगवान श्रीराम यांच्यानंतर छत्रपती शिवरायांनी धर्मासाठी काम केले. धर्माचे पहिले प्रकाशन प्रभू रामचंद्र आहे. तर दुसरे प्रकाशन छत्रपती शिवाजी महाराज आहेत. राष्ट्राची संजीवनी छत्रपती शिवाजी महाराज आहेत.’
जनतेच्या प्रश्नांसाठी लढलो
श्रीरंग बारणे म्हणाले, ‘महापालिका ते लोकसभा निवडणुकीतील संघर्ष मांडला आले. स्थायी समिती निवडणूक खूपच वेगळी आणि रोमहर्षक होती. विधानसभेला अपयश आले तरी खचून न जाता जनतेच्या प्रश्नांसाठी लढत राहिलो. त्याचा फायदा लोकसभेला झालो. जनतेमुळे तिसऱ्यांदा खासदार झालो आहे.’