वारंवार ‘बत्ती गूल’ ...! वाल्हेकरवाडीत तब्बल १४ तास वीजपुरवठा खंडित
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 16:01 IST2025-09-28T16:01:12+5:302025-09-28T16:01:12+5:30
- केबल शोधण्यासाठी महावितरणची धांदल, नवीन केबल टाकण्यास नागरिकांचा विरोध

वारंवार ‘बत्ती गूल’ ...! वाल्हेकरवाडीत तब्बल १४ तास वीजपुरवठा खंडित
पिंपरी : वाल्हेकरवाडी परिसरात गुरुवारी (दि. २५) तब्बल १४ तास वीजपुरवठा खंडित होता. चिंचवड उप वीजकेंद्रातून येणाऱ्या वाहिनीत अचानक बिघाड झाल्याने सकाळपासून पुरवठा खंडित होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरा वाहिन्या दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत केला.
बिघाड झाल्यानंतर महावितरणचे पथक घटनास्थळावर दाखल झाले आणि खोदकाम सुरू केले. मात्र, नेमकी कोणती विजेची केबल तुटली आहे हे शोधण्यात आठ तासांहून अधिक वेळ लागला. खोदकाम करताना स्मार्ट कॅमेऱ्यांची केबल, जिओ फायबर, तसेच २४ तास पाणीपुरवठा लाइन्स सापडत होती; पण विजेची तुटलेली केबल सापडली नाही. शेवटी एक तुटलेली केबल सापडून जोडली गेली आणि विजेचा पुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, त्यानंतर अवजड वाहनांनी रस्त्यावरून गेल्यामुळे केबल पुन्हा तुटली आणि विजेचा पुरवठा पुन्हा खंडित झाला.
विद्युत पुरवठा सुधारण्याच्या दृष्टीने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नवीन केबल टाकण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, स्थानिकांनी केबल टाकण्याला विरोध दर्शविला, ज्यामुळे कामास अडथळा निर्माण झाल्याचे महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
आम्ही खरोखर स्मार्ट सिटीत राहतो की अजूनही गावखेड्यात, हेच समजेनासे झाले आहे. सकाळी नऊ वाजता वाहिनी जळाली; पण काम संध्याकाळी सहाला सुरू झाले. अजूनही कधी वीज येते आणि कधी जाते, काहीच कळत नाही. - रेश्मा बोरा, नागरिक
वाल्हेकरवाडीतील जय मल्हार कॉलनीतील वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला असून, त्या परिसराला नवीन वीजवाहिनी टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. - प्रगती पाटील, सहायक अभियंता, महावितरण