ब्युटी पार्लर चालवणाऱ्या घटस्फोटीत महिलेवर बलात्कार; तीन लाखांचे दागिनेही केले लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 19:57 IST2022-01-15T19:48:27+5:302022-01-15T19:57:08+5:30
ऑगस्ट २०१९ ते १४ जानेवारी २०२२ या कालावधीत पिंपळे सौदागर येथे ही घटना घडली.

ब्युटी पार्लर चालवणाऱ्या घटस्फोटीत महिलेवर बलात्कार; तीन लाखांचे दागिनेही केले लंपास
पिंपरी : ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या घटस्फोटीत महिलेला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर महिलेसोबत वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. महिलेकडून ऑनलाइनद्वारे पैसे घेतले. तसेच तिच्या घरातील तीन लाखांचे दागिने घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी एका उच्चशिक्षित तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ऑगस्ट २०१९ ते १४ जानेवारी २०२२ या कालावधीत पिंपळे सौदागर येथे ही घटना घडली.
दीपक आत्माराम शेंडगे (रा. भोसरी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पीडित ३७ वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. १४) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा घटस्फोट झाला असून, पीडित महिलेचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. पीडितेने दुसरे लग्न करण्यासाठी मॅट्रिमोनी वेबसाईटवर नाव नोंदणी केली होती. त्या वेबसाइटच्या ॲपवरून पीडितेची आणि आरोपीची ओळख झाली. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पीडितेसोबत वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. आरोपीने वेगवेगळी कारणे सांगून पीडित फिर्यादी महिलेकडून एक लाख ९० हजार रुपये रोख व एक लाख ७० हजार रुपये ऑनलाइनद्वारे घेतले.
पीडित फिर्यादी महिला ३० सप्टेंबर २०१९ रोजी घरी नसताना फिर्यादीने त्याच्याकडील चावीने घर उघडून घरातून तीन लाख रुपये सोन्याचे दागिने फिर्यादीच्या नकळत घेतले. तसेच ते दागिने परत न देता फसवणूक करून अपहार केला. तुझे फोटो माझ्याकडे आहेत, ते मी तुझ्या घरच्यांना शेअर करेल, असे बोलून आरोपीने फिर्यादी महिलेला धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.