बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 15:47 IST2021-07-08T15:47:41+5:302021-07-08T15:47:47+5:30
धक्काबुक्की आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली

बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच धक्काबुक्की
पिंपरी: बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आणि साक्षीदाराला त्याने धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बुधवारी नाणेकरवाडी गावच्या हद्दीत ही घटना घडली. धक्काबुक्की आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. इश्वर उर्फ अक्षय गोविंद पाटील (वय २५, रा. नाणेकरवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार नितिन ज्ञानेश्वर गुंजाळ यांनी या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील हा बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी हवा होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असताना तो नाणेकरवाडी येथे सोन्या भालेकर यांच्या खोलीत राहत असल्याचे पोलिसांना कळाले. त्यानुसार साक्षिदार, पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदार हे त्याला पकडण्यासाठी गेले. त्यावेळी तो घरात दरवाज्याच्याआड लपून बसला. पोलीस त्याला पकडत असताना त्याने साक्षीदार व पोलिस अधिकारी यांना हाताने मारहाण व धक्काबुक्की केली.