सावधान..! रस्त्यावरील खाद्यपदार्थांत अस्वच्छतेची भेसळ; आरोग्याशी खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 16:20 IST2025-09-01T16:19:52+5:302025-09-01T16:20:17+5:30

- शहरातील हातगाडे, स्टाॅल्सच्या तपासणीकडे अन्न-औषध प्रशासनाचे दुर्लक्ष : शिळ्या आणि सडक्या भाज्या; आरोग्यास घातक पदार्थ, रंग; अशुद्ध पाणी; प्लॅस्टिकच्या प्लेटचा वापर

pune news street food is contaminated with unsanitary substances; Playing with the health of consumers during the Ganesh festival | सावधान..! रस्त्यावरील खाद्यपदार्थांत अस्वच्छतेची भेसळ; आरोग्याशी खेळ

सावधान..! रस्त्यावरील खाद्यपदार्थांत अस्वच्छतेची भेसळ; आरोग्याशी खेळ

- प्रशांत होनमाने

पिंपरी :
गणेशोत्सवानिमित्त शहरातील रस्त्यांवर गर्दी वाढली आहे. यात रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थ स्टॉल्सवर ग्राहकांचा गराडा पडत आहे. पिंपरी, भोसरी, नवी सांगवी, चिंचवड, आकुर्डी स्टेशन, निगडी, रावेत, भक्ती-शक्ती चौक येथे ‘लोकमत’ने पाहणी केली असता बहुतांश खाद्यपदार्थ स्टॉल्स, हातगाड्यांवर स्वच्छता नसल्याचे दिसून आले.

गणेशोत्सवात सायंकाळनंतर देखावे पाहण्यासाठी आबालवृद्ध रस्त्यांवर गर्दी करत आहेत. डोसा, पिझ्झा, बर्गर, वडापाव, समोसा, पाणीपुरी, भेळपुरी, मिसळ पाव, छोले भटूरे, आईस्क्रीम, कच्छी दाबेली, सॅण्डविच, पुरीभाजी, भाजी-चपाती, डाळभात, पुलाव यांसह विविध खाद्यपदार्थ विक्रीचे स्टाॅल्स, हातगाडे शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यावरही थाटले आहेत. मात्र, अनेक स्टॉल्सवर स्वच्छतेचा अभाव आहे. काही ठिकाणी खाद्यपदार्थांचा दर्जाही राखला जात नाही. त्यामुळे हे पदार्थ खाण्यायोग्य नसल्याचे दिसून आले.

अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ तयार करताना भाज्या शिळ्या आणि सडक्या वापरल्या जातात. प्रमाणीत नसलेले पदार्थ तसेच भेसळ असलेले, आरोग्यास घातक असलेले पदार्थ, रंग वापरले जातात. काही ठिकाणी पिण्यासाठी अशुद्ध पाणी देण्यात येते. काही ठिकाणी पिण्यासाठी पाणी दिले जात नाही. खाद्यपदार्थांसाठी प्लॅस्टिकच्या प्लेटचा वापर होतो. स्वच्छ न केलेल्या प्लेटमध्येच खाद्यपदार्थ दिले जातात. एकाच बादलीत खराब पाण्यात प्लेट धुतल्या जातात. खाद्यपदार्थ तळण्यासाठी सातत्याने पुन्हा वापरलेले तेल वापरले जाते. खाद्यपदार्थ तयार करताना हातमोजे, डोक्यावरील केस झाकणारी टोपी वापरण्याकडे दुर्लक्ष होते. स्वच्छतेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात नाहीत. खाद्यपदार्थांचे पार्सल देतानाही प्लॅस्टिकचा वापर केला जातो.  

खाद्यपदार्थ दुकानांची अन्न प्रशासनाकडून तपासणी होत नाही, असे एका खाद्यविक्रेत्याने सांगितले. नागरिकांनी बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्यापूर्वी त्यांचा दर्जा तपासावा. ते तयार करताना स्वच्छता होते किंवा नाही याबाबत विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
 
तंबाखू खाऊन खाद्यपदार्थांची विक्री
काही विक्रेते तंबाखू आणि गुटखा खात खाद्यपदार्थांची विक्री करतात. अनेकजण खाद्यपदार्थ तयार करतानाही गुटखा खात असतात. त्याचवेळी त्यांचे इतरांशी बोलणेही सुरूच असते. खाद्यपदार्थ तयार करत असतानाच तेथेच तंबाखू आणि गुटखा थुंकून अस्वच्छता केली जाते. काहीजण मद्यपान, धूम्रपान करतात. हात स्वच्छ न धुताच खाद्यपदार्थ तयार करतात किंवा ग्राहकांना देत असल्याचे पाहणीत दिसून आले. 
 
पाहणीत काय आढळले?
-खाद्यपदार्थाच्या गाड्याजवळच कचरा टाकला जातो.
-हात धुण्यासाठी व्यवस्था नसल्याने पाणी साचून राहते.
-गाड्यांजवळ माशा, डास, उंदीर, झुरळ.
-पाण्याच्या बाटल्या, प्लेट, ग्लास, कप यासह प्लॅस्टिकचा कचरा.
-खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्या तसेच ओला कचरा.
-गाड्यांवरील कामगार, आचारी यांचे कपडे अस्वच्छ.
-हातमोजे, ॲप्रन, केसांसाठी रुमाल, मास्कचा वापर नाही.
-काही गाड्यांवरील कामगार आजारी, शिंकत आणि खोकत होते.
-खाद्यपदार्थांसाठीही अशुद्ध पाण्याचा वापर.
-खाद्यपदार्थ गाड्यांजवळ भटकी कुत्री, जनावरांचा वावर.
-अन्नपदार्थ झाकलेले, ताजे व गरम नव्हते, उघड्यावर होते. 


शहरात खाद्यपदार्थ दुकाने, हॉटेल आणि स्टॉलची संख्या हजारोंमध्ये आहे. त्या तुलनेत अन्न प्रशासन विभागाकडे मनुष्यबळ उपलब्ध नाही. मनुष्यबळ कमी असल्याने सर्वच खाद्यपदार्थ दुकानांची नियमित तपासणी करणे शक्य होत नाही. मात्र, नागरिकांनी प्रमाणित अन्न, खाद्यपदार्थ घ्यावेत. खाद्यपदार्थ घेताना त्यांच्या दर्जाबाबत खातरजमा करावी. -सुरेश अन्नपुरे, सहआयुक्त, अन्न प्रशासन 

रस्त्यावरील खाद्यपदार्थ टाळले पाहिजेत. उघड्यावरच्या पदार्थांपासून पावसाळ्यात आरोग्यास जास्त धोका असतो. खाद्यपदार्थाच्या गाड्याची स्वच्छता कशी आहे, पदार्थ तयार करताना खबरदारी घेतली जाते किंवा नाही, पिण्यासाठी पाणी कसे आहे, माशा, अस्वच्छता आहे का, याबाबत ग्राहकांनी सजग राहिले पाहिजे. उघड्यावरील आणि अस्वच्छ वातावरणात केलेल्या खाद्यपदार्थांमुळे आरोग्यास धोका होतो. खाद्यपदार्थ ताजे असावेत. शिळे किंवा बराचवेळ तयार करून ठेवलेले खाद्यपदार्थ टाळावेत. - डाॅ. हर्षल पाण्डेय, विभागप्रमुख, कम्युनिटी मेडिसीन विभाग, वायसीएम रुग्णालय, पिंपरी

Web Title: pune news street food is contaminated with unsanitary substances; Playing with the health of consumers during the Ganesh festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.