आरएमसीचा राडारोडा अन्  पुण्यात केमिकलयुक्त पाणी थेट नदीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 17:29 IST2026-03-29T12:44:20+5:302026-03-29T17:29:14+5:30

वडगाव खुर्द परिसरातील प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; राजकीय वरदहस्त असल्यानेच कारवाई होत नसल्याची चर्चा बांधकामाच्या राडारोड्यासाठी महापालिकेने वाघोली येथे प्रकल्पाची व्यवस्था केलेली असताना त्याकडे फिरवली पाठ

pune news RMC radar and chemical-laden water directly into the river in Pune | आरएमसीचा राडारोडा अन्  पुण्यात केमिकलयुक्त पाणी थेट नदीत

आरएमसीचा राडारोडा अन्  पुण्यात केमिकलयुक्त पाणी थेट नदीत

- हिरा सरवदे

पुणे :
शहरातील नद्यांच्या सुशोभीकरणासाठी महापालिका कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असतानाच दुसरीकडे मात्र रेडीमिक्स काँक्रीट (एरएमसी) प्रकल्पाचा राडारोडा आणि केमिकल मिश्रित सिमेंट स्लरी थेट मुठा नदीत सोडण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार वडगाव खुर्द येथील वडजाई माता मंदिर परिसरात सुरू आहे. दरम्यान, येथील प्रकल्पांना राजकीय वरदहस्त असल्यानेच प्रशासन प्रभावी कारवाई करत नसल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.

शहरातील बांधकामाचा राडारोड्यासाठी महापालिकेने वाघोली येथे प्रकल्पाची व्यवस्था केली आहे. यासाठी महापालिकेने नियमावलीही तयार केली आहे. मात्र, बांधकामाचा राडारोडा वाघोली येथील खाणीकडे न पाठवता नदी पात्र, शहरातून वाहणारा कालवा, रस्ते, सार्वजनिक ठिकाणी टाकला जातो. महापालिकेकडून राडारोडा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, अधिकाऱ्यांचे बांधकाम व्यावसायिकांशी असणारे लागेबांधे, राजकीय हस्तक्षेप आणि दहशतीमुळे यावर प्रभावी कारवाई होत नाही. कालवा आणि नदीवर जलसंपदा विभागाची मालकी असल्याने महापालिका अधिकाऱ्यांकडून या प्रकाराकडे कानाडोळा केला जातो. तर कारवाईसाठी आमच्याकडे यंत्रणा नाही, त्यामुळे अशा अतिक्रमणांवर महापालिकेनेच कारवाई करावी, असे म्हणत जलसंपदाचे अधिकारी हात झटकतात. जलसंपदा विभाग आणि महापालिका प्रशासनाच्या या ढकलाढकलीचा गैरफायदा घेत खुलेआमपणे राडारोडा नदीत टाकला जातो.

वडगाव खुर्द (जुने गावठाण) येथील वडजाईमाता मंदिराच्या परिसरात पाच आरएमसी प्रकल्प आहेत. यातील काही प्रकल्प हे नदीपात्राच्या लगत थाटण्यात आले आहेत. या प्रकल्पातील सिमेंट काँक्रीटचा राडारोडा, केमिकल मिश्रित स्लरी थेट नदीत सोडण्यात येते. यामुळे नदीतील पाणी पांढरे व लालसर झाले आहे. तसेच गाडीमध्ये शिल्लक राहिलेली सिमेंट मिश्रित खडी जागा मिळेल तिथे खाली केली जाते.

येथील प्रकल्पांवर महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून कारवाई केली जाते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांवरून आणि तहसीलदारांकडून नोटीस दिल्या जातात. मात्र, राजकीय वरदहस्तामुळे ही कारवाई नावालाच आणि तकलादूपणाची होते. कारवाईनंतर काही दिवसांत किंवा काही तासांत पे प्रकल्प पुन्हा सुरू होतात. याशिवाय या परिसरातच नदीपात्रापर्यंत मुरूम आणि राडारोडा टाकून व्यावसायिक वापरासाठी प्लॉट तयार करण्याचे कामही सुरू आहे. त्यामुळे नदीला कोणी वाली आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

आरएमसी प्रकल्पात ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसभरात दीडशे पेक्षा अधिक आहे. यामुळे या परिसरात धुळीचे साम्राज्य आहे. या धुळीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या असून, फुप्फुसाचे आजार होण्याचा धोका आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, ठोक कारवाई होत नाही. कारवाई केली तर ती केवळ नावालाच होते. कारवाईनंतर काही तासात पुन्हा प्रकल्प तयार होतात. शिवाय महापालिकेच्या डीपीमध्ये मैदानासाठी आरक्षित असलेल्या जागेचाही वापर या वाहनांकडून केला जातो. - संतोष पोकळे, स्थानिक युवक

येथील आरएमसी प्रकल्पांवर यापूर्वीही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकल्पाची पुन्हा एकदा तातडीने पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल. - अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता, महापालिका

Web Title : आरएमसी की लापरवाही: पुणे में रासायनिक जल सीधे नदी में

Web Summary : पुणे के वडगांव खुर्द के पास आरएमसी परियोजना का कचरा और रासायनिक स्लरी मुथा नदी को प्रदूषित कर रही है। स्थानीय लोगों का आरोप है कि राजनीतिक समर्थन इन उल्लंघनों के खिलाफ प्रभावी प्रशासनिक कार्रवाई में बाधा डाल रहा है, जिससे पर्यावरणीय क्षति और स्वास्थ्य जोखिम हो रहे हैं।

Web Title : RMC's Negligence: Chemical-laden Water Directly Polluting Pune's River

Web Summary : RMC project waste and chemical slurry are polluting Mutha River near Vadgaon Khurd, Pune. Locals allege political backing hinders effective administrative action against these violations, leading to environmental damage and health risks.