आमदार सुनील शेळके यांच्या हत्येच्या कटाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 16:15 IST2025-09-27T16:14:38+5:302025-09-27T16:15:40+5:30
- पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून विशेष तपास पथकाची स्थापना

आमदार सुनील शेळके यांच्या हत्येच्या कटाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी
वडगाव मावळ : तळेगाव दाभाडे परिसरात आमदार सुनील शेळके यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा प्रकार उघडकीस आला होता. पिंपरी-चिंचवड दरोडाविरोधी पथकाने मोठ्या शस्त्रसाठ्यासह संशयितांना जेरबंद केले होते. या कटामागील सूत्रधार कोण, याचा तपास करण्याची मागणी आमदार शेळके यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबत आदेश काढले असून, पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्याकडे या एसआयटीचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. या पथकात सहायक आयुक्त डाॅ. विशाल हिरे, तळेगाव दाभाडेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात, गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने, सहायक पोलिस निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र खामगळ, पोलिस हवालदार अंकुश लांडे, सचिन बेंबाळे, सुनील सगर यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
आमदार शेळके यांनी लक्षवेधी मांडणी करताना सांगितले होते की, माझा संशयितांशी कुठलाही वैयक्तिक वाद नाही. ते सर्वसामान्य कुटुंबातील असून इतका मोठा शस्त्रसाठा खरेदी करण्यासाठी लागणारा खर्च कोण उचलतोय? नामांकित वकिलांची फी कोण भरतोय? त्यांना पाठबळ देणारा नेमका कोण आहे? याची सखोल चौकशी व्हावी.
त्यावर गृहराज्यमंत्री कदम यांनी सात दिवसांत एसआयटी स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार विशेष तपास पथक कामाला लागणार असून तपास सुरू होणार आहे.