महापालिकेच्या भोसरी रुग्णालयातील एक्स-रे विभागात कर्मचाऱ्यांच्या दारूच्या पार्ट्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 14:53 IST2025-10-28T14:50:37+5:302025-10-28T14:53:00+5:30
सकाळच्या वेळी बाह्य रुग्ण तपासणी विभागात (ओपीडी) मोठी गर्दी

महापालिकेच्या भोसरी रुग्णालयातील एक्स-रे विभागात कर्मचाऱ्यांच्या दारूच्या पार्ट्या
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी रुग्णालयातील एक्स-रे विभागात कर्मचारी दारूच्या पार्ट्या करत असल्याचा प्रकार उघडकीस आला. नशेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हा प्रकार बऱ्याच दिवसांपासून सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे.
भोसरी रुग्णालय हे महापालिकेच्या आठ प्रमुख रुग्णालयांपैकी १०० बेडचे एक आहे. येथे भोसरीसह आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी येतात. सकाळच्या वेळी बाह्य रुग्ण तपासणी विभागात (ओपीडी) गर्दी असते, तसेच दाखल रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र, एक्स-रे विभागात कर्मचारी दारूच्या नशेत धुंद होऊन पार्ट्या करत असल्याचे उघड झाले. यासंबंधीचे व्हिडीओमध्ये एक्स-रे टेक्निशियन दारूच्या पार्ट्या करताना दिसत आहेत. तसेच, रिकाम्या दारूच्या बाटल्यांनी भरलेला बॉक्सही व्हिडीओत दिसत आहे. यापैकी दोन कर्मचारी नशेत झोपलेले दिसतात.
लॉक केलेल्या खोलीत पार्ट्या
रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना याची माहिती मिळू नये, यासाठी एक्स-रे विभागाचा दरवाजा बाहेरून लॉक करून या पार्ट्या केल्या जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांचाही या प्रकरणात सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना त्रास
नशेत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच, येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांशीही हे कर्मचारी उद्धटपणे वागत असल्याचे समजते. विशेषत: रात्रीच्या वेळी एक्स-रे आवश्यक असताना, नशेत असलेले कर्मचारी हे काम करतात, ज्यामुळे रुग्णांना असुविधा होत आहे.
महिला रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न
रुग्णालयात मोठ्या संख्येने महिला रुग्ण उपचारासाठी येतात. रात्रीच्या वेळी एक्स-रे काढण्याची गरज पडल्यास, नशेत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून हे काम केले जाते. यामुळे महिला रुग्णांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने रुग्णालयातील सुरक्षितता आणि प्रशासकीय बेजबाबदारपणावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, याबाबत तातडीने कारवाईची मागणी होत आहे.
रुग्णालयात असे प्रकार घडणे खूप गंभीर घटना असून, भोसरी रुग्णालयातील दोन एक्स-रे टेक्निशियन व वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच कोणत्याच रुग्णालयात असे प्रकार होणार नाहीत, यासाठी सर्वच रुग्णालय प्रमुख व सुरक्षारक्षकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. - डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका