आवाज वाढव ‘डीजे’ तुला... काळजी करायचं काम नाय..!पोलिस, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कानावर हात
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: September 4, 2025 15:25 IST2025-09-04T15:17:48+5:302025-09-04T15:25:49+5:30
: पिंपरी-चिंचवड शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मर्यादा ९८.८ डेसिबलहून जास्त असूनही दुर्लक्ष

आवाज वाढव ‘डीजे’ तुला... काळजी करायचं काम नाय..!पोलिस, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कानावर हात
पिंपरी : सातव्या दिवशी झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने यंदाही शहराला धडकी भरली. सर्वोच्च न्यायालय आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार ध्वनिमर्यादा काटेकोरपणे पाळायची असतानाही नियमांना पायदळी तुडवले गेले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या गोंगाटामुळे नागरिकांना कानात बोळे घालावे लागले. पोलिस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मात्र कानावर हात असल्याने कार्यकर्त्यांना चेव आला होता.
व्यावसायिक व नागरी वस्तीमध्ये सरासरी ४५ ते ६५ डेसिबल आवाजाची मर्यादा बंधनकारक आहे. मात्र, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मिरवणुकांमध्ये काही जणांकडून ही मर्यादा पाळली जात नसल्याचे चित्र आहे. मंगळवारी विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान तब्बल ९८.८ डेसिबलपर्यंत आवाज पोहोचला. नागरिकांच्या तक्रारींनंतर दरवेळी कारवाईचे आश्वासन दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात काही दोषींना कागदी नोटिसा देण्यापलीकडे काहीही होत नाही. त्यामुळे आयोजकांवर वचक राहिलेला नाही, उलट दरवर्षी आवाजाची पातळी अधिकाधिक वाढत आहे. याबाबत पोलिस, प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिका प्रशासनाने मौन बाळगले आहे.
नागरिकांचा आक्रोश ऐकणार कोण?
दरवर्षी ध्वनिप्रदूषणाविरोधात कारवाई होईल, असे इशारे दिले जातात, पण ‘डीजे’चा आवाज इतका प्रचंड असतो की, घरांच्या भिंती हादरतात. रुग्ण, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना जबर त्रास सहन करावा लागतो, तरीही प्रशासन कानावर हात ठेवत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
नागरिकांचे प्रश्न
- ध्वनिमर्यादा मोडणाऱ्यांवर कारवाई कोण करणार?
- सर्वोच्च न्यायालयाचे आदेश फक्त कागदोपत्रीच का?
- प्रशासनाचे मौन म्हणजे नियमभंगाला अप्रत्यक्ष मान्यता?
मंगळवारी कुठे किती आवाज...
ठिकाण - वेळ - आवाज (डेसिबलमध्ये)
सांगवी - सायं. ५:२३ - ८२.४
भोसरी - सायं. ५:५४ - ९८.८
मोशी - सायं. ६:०३ - ९७.६
निगडी - सायं. ६:२७ - ८२.६
पिंपरी - सायं. ७:०२ - ९१.६
------
या ठिकाणी पोलिसांनी केले पंचनामे
- सांगवी : ५
- भोसरी : ४
- एमआयडीसी भोसरी : ९
पिंपरी-चिंचवड शहरातील ध्वनिप्रदूषणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी थोडी घट जाणवते. त्यांचे सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. - मंचक जाधव, उपविभागीय अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ
मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषणाबाबत स्थानिक पोलिस ठाण्यांकडून पंचनामे करण्यात आले आहेत. अहवाल मिळाल्यानंतर संबंधित ‘डीजे’ मालकांना नोटीस देऊन कायदेशीर कारवाई होईल. - संदीप आटोळे, पोलिस उपायुक्त
शहरातील विसर्जन मिरवणुकीत सांगवी, भोसरी, निगडी, पिंपरी परिसरात आवाजाची मर्यादा वाढली आहे. त्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविण्यात आला आहे.- संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, महापालिका