भावकीतील मुलीला गाडीतून घरी सोडल्याच्या वादातून तरुणावर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 12:53 IST2025-09-10T12:51:27+5:302025-09-10T12:53:47+5:30
वडगाव मावळ येथील घटना : तरुण बचावला; चार संशयित फरार; शोधासाठी पोलिसांची पथके रवाना

भावकीतील मुलीला गाडीतून घरी सोडल्याच्या वादातून तरुणावर गोळीबार
वडगाव मावळ : भावकीतील शालेय मुलीला गाडीतून सोडल्याच्या वादातून चार तरुणांनी एकावर गोळीबार केला. त्यानंतर चारही संशयित पळून गेले. वडगाव मावळ येथील केशवनगरमध्ये सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.
अक्षय एकनाथ मोहिते (वय २८, रा. पवारवस्ती, केशवनगर, वडगाव मावळ, ता. मावळ) यांनी याप्रकरणी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सौरभ रोहिदास वाघमारे (रा. कुरकुंडे, ता. खेड, जि. पुणे), अभिजित राजाराम ओवाळ (रा. सांगवी, ता. मावळ), रणजित बाळासाहेब ओव्हाळ (रा. सांगवी, ता. मावळ), प्रथमेश दिवे (रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
वडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय यांचा नातेवाईक असलेला मुलगा दहावीमध्ये शिकत आहे. त्याने सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) दुपारी तीन वाजता संशयितांच्या भावकीतील मुलीला शाळेतून तिच्या घरी सोडले होते. त्यावरून संशयितांनी त्याला पाच वाजता शाळेच्या बाहेर मोटारीत जबरदस्तीने बसवून मारहाण केली होती.
त्यावरून फिर्यादी अक्षय आणि संशयितांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर साडेसहाच्या सुमारास अक्षय मित्रांसह केशवनगरमधील एकवीरा चौकात थांबले होते. त्यावेळी संशयित रणजित आणि प्रथमेश दुचाकीवरून आले. रणजितने अक्षय यांना शिवीगाळ केली. त्यानंतर सौरभ आणि अभिजित हेही दुचाकीवरून तेथे आले. सौरभने शिवीगाळ करून त्याच्याकडील पिस्तुलातून अक्षय यांच्या दिशेने गोळी झाडली. परंतु गोळी झाडली गेली नाही. त्यातील काडतूस खाली पडले. त्यावेळी अक्षय आणि त्यांचे मित्र तिथून पळून जात असतानाच सौरभने पुन्हा एकदा पिस्तुलातून गोळीबार केला; परंतु कोणालाही गोळी लागली नाही. त्यानंतर अक्षय जवळच असलेल्या हाउसिंग सोसायटीत लपून बसले. काही वेळाने संशयितांनी गाडीवरून पोबारा केला.
गोळीबारामध्ये कोणीही जखमी झाले नाही. संशयितांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि वडगाव मावळ पोलिस ठाण्याची दोन पथके रवाना झाली आहेत. पोलिस निरीक्षक कुमार कदम तपास करीत आहेत.